Mon, Nov 19, 2018 07:13



होमपेज › Ahamadnagar › कुपोषित बालके शोधायला स्टेडिओमीटर!

कुपोषित बालके शोधायला स्टेडिओमीटर!

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 13 2018 12:29AM



नगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातल्या बालकांची उंची व लांबी मोजण्यासाठी स्टेडिओमीटर हे उपकरण  शाळा व अंगणवाड्यांना देण्यात येणार आहे. उंची व लांबी मोजल्यास बालकांच्या कुपोषणाचा स्तर कळण्यास मदत होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी दिली.

समितीची सभा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस सदस्या मीरा शेटे, राणी लंके, अनुसया होन, मनिषा ओहोळ, सुनिता गडाख, सुनिता भांगरे, रोहिणी निघुते आदी उपस्थित होते. बैठकीत अंगणवाड्यातील सेविका, मदतनीस, पर्यवेक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याची परवानगी देण्याची विनंती शासनास करण्याचे ठरले.

ज्या अंगणवाड्यांना गॅस, शेगडी, सिलेंडर, कुकर, धान्य साठविण्यासाठी कोठ्या, डबे आदी साहित्य उपलब्ध नाही. त्या अंगणवाड्यांना हे साहित्य ग्रामपंचायतींच्या महिला व बालकल्याणसाठीच्या 10 टक्के राखीव निधीतून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाला देण्यात आल्या. जंगलाच्या लगत असलेल्या अंगणवाड्यांना जिल्हा नियोजन योजनेंतर्गत वॉल कंपाउंड बांधण्यासाठी निधी मिळावा यासाठी अशा अंगणवाड्यांची माहिती घेऊन नियोजन समितीकडे पाठपुरावा करण्याचेही निर्देश देण्यात आले.

पाचवी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना लेडीज सायकल पुरविणे, अनुसूचित जातीतील  महिलांना पिठाची गिरणी पुरविण्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांना मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय अंगणवाडी केंद्रांमधल्या रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. त्यात जामखेड तालुक्यात 38 अंगणवाडी सेविका व 46 मदतनीसांची पदे रिक्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे खास बाब म्हणून ही रिक्त पदे भरण्याचा ठराव शासनास पाठविण्यात येणार आहे.