Mon, Jun 24, 2019 17:04होमपेज › Ahamadnagar › ‘आता छिंदमची बुद्धीही भ्रष्ट झालीय’

‘आता छिंदमची बुद्धीही भ्रष्ट झालीय’

Published On: Jun 09 2018 1:32AM | Last Updated: Jun 09 2018 12:02AMनगर ः प्रतिनिधी

श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी तात्काळ त्याची हकालपट्टी केल्याचे व उपमहापौर पदाचा राजीनामा घेण्यात आल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले. दुसर्‍या दिवशी खा. गांधी यांच्या कार्यालयातून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची प्रत महापौर कार्यालयात व आयुक्तांच्या कार्यालयात आणून दिली होती, असा दावा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केला आहे. छिंदमने महापौरांवर केलेले आरोप तथ्यहीन असून आता त्याची बुध्दी भ्रष्ट झाल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नगरसेवक पद रद्द करण्याच्या महासभेच्या ठरावाला आक्षेप घेत छिंदमने महापौरांवर गंभीर आरोप केले आहेत. मी स्वतःच्या स्वाक्षरीचा उपमहापौर पदाचा राजीनामा दिलेलाच नसून महापौरांनीच माझ्या लेटरहेडचा गैरवापर केल्याचे त्याने ‘नगरविकास’ला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. छिंदमने केलेला आरोप फेटाळून लावत त्याचा राजीनामा घेतल्याचे जाहीर करणार्‍या खा. गांधींवरही संभाजी कदम यांनी निषाणा साधला आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, खा. गांधी यांच्या कार्यालयातून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची पत्र महापौर व आयुक्‍तांच्या कार्यालयात पाठविली. महापौरांनी ती प्रत नगरसचिव कार्यालयाकडे सादर केल्यानंतर प्रशासनाने राजीनाम्यावर पुढील कार्यवाही केली. विभागीय आयुक्तांनी निवडणूक जाहीर केली. शिवसेनेचा बिनविरोध उपमहापौर झाला. महापालिकेच्या महासभेतही सर्व नगरसेवकांनी छिंदमच्या अशोभनीय व कृत्याचा निषेध करत त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला. त्यानंतर आता बुध्दी भ्रष्ट झालेल्या छिंदमला आपण राजीनामाच दिला नसल्याचा साक्षात्कार झालाय. महापौर निवडणूक होऊन दोन-तीन महिने लोटल्यानंतर मी उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नसल्याचे व महापौरांनी त्याच्या लेटरहेडचा गैरवापर करुन गंभीर गुन्हा केल्याच्या बोंबा ठोकण्यास छिंदमने सुरुवात केली आहे. छिंदमचा राजीनामा त्याचे गुरु असलेल्या खासदारांनीच महापौर कार्यालयाकडे पाठवला होता, हे जगजाहीर आहे. त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत घोषणाही केली होती. असे असतांना निव्वळ महापौरांची बदनामी करण्याच्या उद्देशाने छिंदमने बेछूट व तथ्यहीन आरोप करण्यास सुरुवात केली आहे. यातून त्याची बुध्दी खरोखरच भ्रष्ट झाल्याचे सिध्द होत आहे.

छिंदमचा राजीनामा जाहीर करणारे व महापौर कार्यालयाकडे पाठविणारे खा. गांधी व भारतीय जनता पक्षाने यावर मौन बाळगल्यामुळे व कुठलाही खुलासा केलेला नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही संशय निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. केवळ अंगाशी आलेले प्रकरण थांबविण्यासाठी, वेळ मारुन नेण्यासाठी छिंदमचा राजीनामा जाहीर केला होता का? छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्‍याया शिवद्रोही छिंदमचा राजीनामा खासदारांनी घेतलाच नाही का? छत्रपती शिवरायांबद्दल भाजपच्या मनात आदर आणि प्रेम असल्याचे दाखवून देणार्‍या भाजपने व खासदारांनी तमाम शिवप्रेमींची दिशाभूल तर केली नाही ना? असे सवालही कदम यांनी उपस्थित केले आहेत.

भाजप नगरसेवकांना घोषणेचा विसर!

उपमहापौर निवडणुकीवेळी आक्षेप न घेणारा छिंदम आज दोन-तीन महिन्यांनी उपमहापौर पदाच्या राजीनामा दिला नसल्याचे सांगत महापौरांवर बेछूट आरोप करतोय. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार गांधी यावर चकार शब्दही बोलायला तयार नाहीत. महासभेत भाजप नगरसेवक सुवेंद्र गांधी, बाबासाहेब वाकळे यांनी आम्ही जेलमध्ये जावून छिंदमचा नगरसेवक पदाचा राजीनामा घेवून येवू, अशी घोषणा केली होती. त्याचाही त्यांना विसर पडला असल्याचे संभाजी कदम यांनी म्हटले आहे.

खासदार गांधींना जाब विचारणार!
आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल नाक घासून माफी मागत असल्याचा व्हिडीओ पाठविणार छिंदम आता पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करतोय. न्यायालयातही त्याने गुन्हा कबूल न करता जामीन मिळवला आहे. नगरसेवक पद रद्द करण्याचा ठरालाही आक्षेप घेतोय. भाजपचे नेते यावर चुप्पी साधून त्याला उघडपणे मदत करत आहेत. त्यामुळे छिंदमसह भाजप विरोधातही शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा तमाम शिवप्रेमी व शिवसेनेमार्फत भाजपच्या शहराध्यक्षांना जाब विचारणार असल्याचा इशारा संभाजी कदम यांनी दिला आहे.