Thu, Apr 25, 2019 05:29होमपेज › Ahamadnagar › सामाजिक तेढ निर्माण केल्याचे कलम

सामाजिक तेढ निर्माण केल्याचे कलम

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:16PMनगर : प्रतिनिधी

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल श्रीपाद छिंदम याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखाविल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सामाजिक तेढ निर्माण केल्याचे वाढीव कलम (भारतीय दंड विधान कलम 153 अ) लावले आहे. त्याचा अहवाल पोलिसांनी काल (दि. 22) सकाळी न्यायालयात सादर केला आहे. 

छिंदम याच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखाविल्याचा गुन्हा शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आलेला आहे. तसेच त्याचदिवशी सायंकाळी मनपा कर्मचारी अशोक बिडवे यांनीही सरकारी कामात अडथळा आणून धार्मिक भावना दुखाविल्याची स्वतंत्र फिर्याद दिलेली आहे. छिंदम याच्या वक्तव्याने फक्त धार्मिक भावना दुखाविल्या नाही, तर त्यातून सामाजिक तेढही निर्माण झालेली आहे. सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात सामाजिक तेढ निर्माण केल्याचे कलम वाढविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी तोफखाना पोलिसांनी वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर वाढीव कलम लावले. 

गुरुवारी सकाळी त्याचा अहवाल तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी न्यायालयाकडे पाठविला आहे. कुणाच्या वक्तव्याने दोन गट, समूह, व्यक्ती अथवा समाजात तेढ निर्माण झाली, तर त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 153 अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.