Fri, Jul 19, 2019 07:35होमपेज › Ahamadnagar › औटी यांची स्वतंत्र दिंडी पारनेरहून निघणार

औटी यांची स्वतंत्र दिंडी पारनेरहून निघणार

Published On: Jul 02 2018 1:41AM | Last Updated: Jul 01 2018 10:34PMपारनेर : प्रतिनिधी

संत निळोबाराय देवस्थान व ह. भ. प. सोपानकाका औटी यांच्यातील वादावर अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मध्यस्तीने रविवारी तोडगा निघाला असून या तोडग्यानुसार सोपानकाका औटी यांच्या दिंडीचे आता पारनेरहून प्रस्थान होणार आहे. 

गेल्या वर्षीपासून संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या धर्तीवर संत निळोबाराय यांची संजिवन समाधी असलेल्या पिंपळनेर येथून निळोबारायांच्या पालखी सोहळयाचे आयोजन करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी देहू येथील देवस्थानेही पाठबळ  देत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा रथही दिला आहे. गेल्या वर्षी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले.

त्यावेळी सोपानकाका औटी हे देखील त्या बैठकीस उपस्थित होते. परंतु पालखी मार्गाच्या नियोजनावरून विश्‍वस्त व औटी यांच्यात मतभेद होऊन सोपानकाका यांनी स्वतंत्र दिंडीचे आयोजन केले होते. गेल्या वर्षी पहिलेच वर्ष असूनही पालखी सोहळ्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. यंदा पालखी सोहळ्यात 51 दिंड्या सहभागी होणार असून दुसर्‍याच वर्षी या सोहळ्याचे स्वरूप भव्य होणार आहे. अशा स्थितीत सोपानकाका यांनी स्वतंत्र दिंडीचे आयोजन न करता पालखी सोहळ्यातच सहभागी व्हावे, अशी देवस्थानच्या विश्‍वस्थांची भूमिका होती. ज्येष्ठ असलेल्या सोपानकाकांच्या दिंडी सोहळ्याचा संपूर्ण खर्चही देवस्थानने देण्याची तयारी दर्शविली होती.

देवस्थानचे विश्‍वस्थ व सोपानकाका यांच्यात चर्चेच्या अनेक फेर्‍या होऊनही त्यात तोडगा निघाला नव्हता. सोपानकाका यांनी स्वतंत्र पत्रक प्रसिद्ध करून पिंपळनेर येथूनच दिंडीचे प्रस्थान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर या वादात आणखीच भर पडली होती. देवस्थानने त्यावर आक्षेप घेत पिंपळनेहून प्रस्थानास ठाम विरोध दर्शविला. तसे पत्रही पोलिस तसेच महसूल प्रशासनास दिले. देवस्थान हे खाजगी जागेवर असल्याचे सोपानकाका यांना  तेथून प्रस्थान करताच येणार नाही, त्यांनी तसा प्रयत्न केलाच तर आपण आत्मदहन करू व माझ्या मृतदेहावरून दिंडीचे प्रस्थान करावे लागेल, अशी टोकाची भूमिका देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी मांडली होती.

देवस्थानच्या ठरावाच्या प्रती पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांनीही औटी यांना पिंपळनेर ऐवजी अन्य ठिकाणावरून दिंडीचे प्रस्थान करण्यासंदर्भात लेखी पत्र दिले होते. तरीही हा वाद शमण्याची चिन्हे नव्हती. अखेर सोपानकाका औटी तसेच देवस्थानचे विश्‍वस्थ यांनी स्वतंत्रपणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत आपल्या भूमिका मांडल्या. त्यानुसार सोपानकाका पारनेर येथून दिंडीचे प्रस्थान करतील, दिंडी पिंपळनेर येथे जाऊन निळोबारायांच्या संजिवन समाधीचे वारकरी दर्शन घेतील व त्यांच्या मार्गाने दिंडी मार्गस्थ होईल, तर सोहळ्याचे पिंपळनेर येथून प्रस्थान होऊन देवस्थानच्या मार्गाने सोहळा मार्गस्थ होईल, असा तोडगा हजारे यांनी मांडला. तो दोन्ही बाजूंकडून मान्य करण्यात आला. वादावर तोडगा पडल्याने वारकरी सांप्रदायाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.