Wed, Apr 24, 2019 16:35होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांची आस्था नसलेले हे सरकार

शेतकर्‍यांची आस्था नसलेले हे सरकार

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:15PMसोनगाव : वार्ताहर

सरकार पाटपाण्यासंदर्भात चुकीची धोरणे आखून, शेतकर्‍यांची ऊसशेती बिकट बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच सरकारने साखरेच्या भावात अत्यंत घट केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना ऊस उत्पादनातून  चांगला भाव देणे कारखानदारांसमोर आव्हान बनले आहे. सध्याचे सरकार हे शेतकर्‍यांविषयी कोणतीही आस्था नसलेले सरकार असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केली.  राहुरी तालुक्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ. पी. बी. कडू पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन तसेच शांताबाई कडू पाटील पुरस्कार तसेच समाजक्रांती पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे  पाटील तर व्यासपीठावर माजी मंत्री मधुकर  पिचड, चंद्रशेखर घुले, आ. बाळासाहेब थोरात, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. शिवाजी कर्डिले, दादा कळमकर,  प्रसाद तनपुरे, डॉ. अशोक विखे, आ. सुधीर तांबे, आण्णासाहेब म्हस्के, रावसाहेब म्हस्के, चंद्रशेखर कदम, प्राजक्‍त तनपुरे, अविनाश आदिक, अनुराधा आदिक, डॉ. शोभा बच्छाव, सीताराम गायकर, पांडुरंग अभंग,  जयश्री चौगुले, भाऊसाहेब वाकचौरे, मीनाताई जगधने आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, आप्पांनी त्यांच्या विधानसभेच्या कारकिर्दीत जनतेसाठी केलेले कार्य व रयत शिक्षण संस्थेसाठी दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. 1972 ते 1978 मध्ये मी मंत्री असताना नगर जिल्हा पूर्णपणे कम्युनिस्टांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. पण अचानक या जिल्ह्यात भगवा कसा फडकला, हेच मला समजले नाही. पी. बी. कडू पाटील हे विधानसभेतील अत्यंत जागरूक आमदार म्हणून ओळखले जात होते. मी प्रवरानगर येथे शिक्षण घेत असताना त्यावेळचा काळ जर आठवला तर आप्पांनी प्रवरा कारखान्याच्या बाबतीत संघर्ष करून ते चेअरमन झाले. त्यानंतर खर्‍या अर्थाने त्यांनी सहकार क्षेत्राला दिशा देण्याचे मोठे कार्य केले.

मी ज्यावेळी कृषिमंत्री होतो, त्यावेळेस आयात धोरण पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आज सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जर शेतकरी उद्ध्वस्त झाला तर लाल भाकरी खाण्याची वेळ येईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. कॉ. कडू पाटलांनी खंडकरी चळवळीत भाग घेऊन येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनात पुढाकार घेतल्याचे सांगताना अरुण कडू यांनी कॉ. पी. बी. कडू पाटील प्रतिष्ठान स्थापन करून चांगले कार्य केले. या जिल्ह्याने कॉ. पी. बी. कडू यांचे विचार पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी आ. गणपतराव देशमुख यांना शरद पवार यांच्या हस्ते समाजक्रांती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 सत्काराला उत्तर देताना आ. देशमुख म्हणाले, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून सांगोला विधानसभेच्या जनतेने 11 वेळा जो विश्‍वास दाखविला, तो खर्‍या अर्थाने तेथील जनतेचा पुरस्कार आहे. कॉ. पी. बी. कडू हे एक तत्त्वनिष्ठ नेतृत्व होते. अप्पांनी स्वातंत्र्य चळवळीत जी उडी घेतली व त्यांना तुरुंगवास झाला ते अविस्मरणीय आहे. यावेळी ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य, सर्व अधिकारी, पदाधिकारी व जिल्ह्यातील कडू कुटुंबीयांवर प्रेम करणारे असंख्य ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.