Fri, Apr 19, 2019 12:16होमपेज › Ahamadnagar › ११ लाख शेतकर्‍यांना सॉईल हेल्थ कार्ड देणार : जावडेकर

११ लाख शेतकर्‍यांना सॉईल हेल्थ कार्ड देणार : जावडेकर

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 23 2018 11:36PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

कृषी विकासाला नवी दिशा देण्यासाठी केंद्र सरकारने 11 कोटी शेतकर्‍यांना सॉईल हेल्थ कार्ड देण्याचा क्रांतीकारी कार्यक्रम हाती घेतला आहे. भविष्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सॉईल टेस्टींगचे काम करून घेण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. 

बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्राला ना. प्रकाश जावडेकर यांनी काल(दि.23) भेट दिली. त्याप्रसंगी शेतकर्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, जि.प.अध्यक्षा शालिनी विखे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.लाखन सिंग, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.नालकर उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेऊन शेतीमध्ये नवीन प्रयोग केलेल्या शेतकर्‍यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. ऊस, डाळिंब, अंतरपीक, शेवगा लागवड, ठिबक सिंचन, भाजीपाला आदी विषयांबाबत मंत्री जावडेकर यांनी शेतकर्‍यांना बोलते केले.  शेती क्षेत्रात केलेल्या या नवीन प्रयोगाबद्दल जावडेकरांनी उपस्थित शेतकर्‍यांचे कौतुकही केले. प्रारंभी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या प्रदर्शनाला जावडेकर यांनी भेट दिली. प्रातिनिधीक स्वरूपात शेतकर्‍यांना सॉईल हेल्थ टेस्टींग प्रशस्तीपत्रक जावडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. 

 ना.जावडेकर म्हणाले, खासदार म्हणून मी मध्यप्रदेश मध्ये बुंदेलखेड येथील गाव दत्तक घेतले. या गावामध्ये अनेक समस्या होत्या. गावकर्‍यांशी संवाद साधून हे प्रश्‍न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला त्यात यश आले. स्वामिनाथन आयोग आपण स्वीकारला. आज त्याच अनुषंगाने केंद्र सरकर उत्पादन खर्चावर 50 टक्के जादा भाव देण्याचा विचार करीत आहेत. देशातील 11 कोटी शेतकर्‍यांना सॉईल हेल्थ कार्ड देण्याचा क्रांतीकारी कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. भविष्यात तर शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी हे सॉईल टेस्टींग करू शकतील अशा पद्धतीचे नियोजनही करण्याचा मानसही असल्याचा त्यांनी  व्यक्त केला. आज पाण्याची लढाई कोठे नाही. नगर-नाशिक वाद तर मी कायमच ऐकतो. पण शेतीच्या पाण्याला कायमस्वरूपी उपाय म्हणून नद्याजोड प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे. या माध्यमातूनच प्रधानमंत्री सिंचन योजना सुरू करण्यात आली. देशातील प्रलंबित राहिलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे.

ना. राधाकृष्ण विखे म्हणाले, शेती क्षेत्रातील नव्या प्रयोगांबरोबरच महिला बचत गट, फार्मर्स क्लब आणि शेतकर्‍यांच्या कंपन्या या कृषी विज्ञान केंद्रातूनच जोडल्या गेल्या आहेत. बागायती बरोबरच जिरायती भागातील शेतकरी नव्या उमेदीने उभे करण्याचे काम हे कृषी विज्ञान केंद्रातून होत असल्याचे विखे यांनी आवर्जून सांगितले.