Tue, Apr 23, 2019 13:43होमपेज › Ahamadnagar › सामाजिक योजना ही राज्याला दिशादर्शक : सुजय विखे 

सामाजिक योजना ही राज्याला दिशादर्शक : सुजय विखे 

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 12:23AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

शिर्डी मतदारसंघात सुरू केलेली सामाजिक योजना ही राज्याला दिशादर्शक ठरते. मोफत अपघात विमा योजना, मोफत गॅस आणि आता प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड मिळवून देण्याचा सुरू केलेल्या उपक्रमामुळे वंचित राहिलेल्या नागरिकांना येत्या 6 महिन्यात रेशनकार्ड मिळवून देण्याची ग्वाही पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते डॉ.सुजय विखे यांच्या संकल्पनेतून वंचित कुटुंबाना रेशनकार्ड मिळवून देण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बाभळेश्वर येथे याकरिता ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम बेंद्रे होते. याप्रसंगी अण्णासाहेब बेंद्रे, ज्ञानदेव म्हस्के,  उपसभापती बबलू म्हस्के, आबा मोकाशी, मारुती गोरे, सरपंच राजेंद्र म्हस्के, संदीप लहारे, नायब तहसीलदार राहुल कोताडे  आदी उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले की, शासकीय योजनांच्या व्यतिरिक्त आपण मतदार संघातील आपल्या लोकांसाठी काय करू शकतो, याचा विचार माझ्या मनात सातत्याने सुरू असतो. कोणताही उपक्रम सुरू करताना सामान्य माणूस आपण डोळ्यासमोर ठेवतो.  मोफत अपघात विमा योजना  मतदारसंघातील नागरिकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न देशपातळीवर प्रथमच  यशस्वी झाला. एक लाखाहून अधिक मतदार या योजनेत सहभागी झाले आहेत. या सर्वांच्या विम्याची रक्कम ही विखे पाटील परिवार भरत आहे. आतापर्यंत  सव्वादोन कोटी रुपयांचा लाभ अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्यांना मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.