Sun, Jul 21, 2019 16:11
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › ‘ते’ न्यायाधीश अभिनंदनास पात्र!

‘ते’ न्यायाधीश अभिनंदनास पात्र!

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:28PM

बुकमार्क करा
पाथर्डी : शहर प्रतिनिधी

न्यायव्यवस्था देशाची सर्वोच्च संस्था आहे. संविधानाच्या आधारे कायदे बनतात. कायद्याच्या चौकटीत देश चालतो. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी बोलण्याचे धाडस केले असून, ते अभिनंदनास पात्र आहेत.  लोकांचा न्याय पालिकेवरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे देश हुकूमशाहीकडे वळत आहे. याविरुद्ध जनतेने रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

बर्ड संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेनिमित्त हजारे शहरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे देशभर खळबळ उडाली. न्यायपालिकांमधील अंतर्गत खदखद या निमित्ताने पुढे आली. याबाबत विचारले असता हजारे म्हणाले, या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. ही गोष्ट देशासाठी अतिशय चिंताजनक आहे. लोकशाहीला सुद्धा धोका आहे. 1857 च्या बंडापासून 1947 पर्यंत स्वातंत्र्यलढ्यामध्ये लाखोंचे बलिदान व्यर्थ गेले, असे म्हणण्याची वेळ येईल. इंग्रजांना घालवून देशात लोकशाही आणायची, यासाठी सर्वजण लढले. ती लोकशाही सुरक्षित नसेल, तर ती चिंतेची बाब आहे. न्याय व्यवस्थेतील खदखद मांडणारे न्यायाधीश अभिनंदनास पात्र आहेत. अन्यथा देशाला काहीही माहिती झाले नसते. त्यामुळे देश नेमका कुठे चालला आहे, असा प्रश्न पडतो. 

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आत्महत्या करतात. मरण्यापूर्वी सर्व घटना व तपशील पुराव्यासह लिहून ठेवतात. त्याची साधी चौकशी सुद्धा होत नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आत्महत्येबाबत अशी स्थिती असेल, तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न अस्वस्थ करतो. आता जनतेला जागृत व्हावे लागेल. देशासाठी रस्त्यावर यावे लागेल. देशात प्रबळ विरोधी पक्ष नाही. चुकून विरोधक बोलले, तर प्रभाव पडत नाही. कारण ते चुका करून बसलेत. त्याची वाच्यता होण्याची त्यांना भीती वाटते. लोकांच्या प्रश्नाबरोबरच देशासाठी आपण तीन वेळा तुरुंगात होतो. त्या तीनही वेळेस सरकार पडले, असे अण्णा म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, डॉ. दीपक देशमुख, डॉ. भाऊसाहेब लांडे, डॉ.शिरीष जोशी, डॉ. ऋषिकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

चौथा स्तंभही मजबूत हवा 

माध्यमांची गळचेपी, पत्रकारांवर दडपणे आणणे सुद्धा लोकशाही व देशासाठी घातक आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रकार अयोग्य असून, त्यामुळे अराजकता वाढीस लागू शकते. त्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभही मजबूतच हवा, असेही हजारे यावेळी म्हणाले.