Tue, Apr 23, 2019 02:02होमपेज › Ahamadnagar › उपोषण सुटल्याने राळेगणसिद्धीत जल्लोष

उपोषण सुटल्याने राळेगणसिद्धीत जल्लोष

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पारनेर : प्रतिनिधी   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्‍वासनाचे पत्र सुपूर्द केल्यानंतर काल (दि.29) पाच वाजता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेतल्याचे वृत्त समजताच राळेगणसिद्धी ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. ग्रामदैवत संत यादवबाबांना साखरेचा नैवेद्य, तसेच हार अर्पण करण्यात आल्यानंतर गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत ग्रामस्थांनी एकच जल्‍लोष केला.  

सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करून राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी बुधवारी सर्व शासकीय कर्मचार्‍यांना गावाबाहेर पाठवून हमारा गाव, हमारी सरकारचा नारा दिला होता. सरकारला जाग आणण्यासाठी राळेगणच्या ग्रामस्थांनी काल सामूहिक आत्मदहनाचा इशाराही दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच तेथील वातावरण तणावपूर्ण होते. सकाळी ग्रामस्थांनी यादवबाबा मंदिराच्या प्रांगणात लाकडे आणून आत्मदहनाची तयारी केली होती. पोलिस प्रशासनाने गावामध्ये साध्या वेशातील पोलिस पाठवून ग्रामस्थांना आत्मदहनापासून रोखण्याची काळजी घेतली होती. तर गावाच्या चारही बाजूंनी राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तैनात केले होते. दुपारनंतर आंदोलनात तोडगा निघत असल्याची बातमी आल्यानंतर मात्र ग्रामस्थांमधील तणाव काहीसा कमी झाला. तसेच ग्रामस्थ तेथून पांगले. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्‍वास सोडला. दरम्यान, हजारे यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या पारनेर बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. टाकळीढोकेश्‍वर, जवळे, सुपा, देविभोयरे फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

सायंकाळी पाच वाजता हजारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतल्याचे वृत्त येताच राळेगणसिद्धी ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. यादवबाबा मंदिरापासून पद्मावती मंदिरापर्यंत ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. भारत माता की जय, वंद मातरम, अण्णा हजारे झिंदाबाद अशा घोषणा देण्यात येत होत्या. उपोषण मागे घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र सदन येथे जाऊन विश्रांती घेणे पसंत केले. आज (दि.30) दुपारी ते विमानाने राळेगणसिद्धीकडे परतणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय संजय पठाडे यांनी सांगितले. हजारे यांच्या आगमनानंतर राळेगणसिद्धीत पुन्हा जल्‍लोष होणार आहे. 

Tags : Ahmadnagar, Ahmadnagar News, Social activist, Anna Hazare, Saturday, withdrew, fast.


  •