Mon, May 20, 2019 10:06होमपेज › Ahamadnagar › सहा दरोडेखोरांना 2 वर्षे सक्तमजुरी

सहा दरोडेखोरांना 2 वर्षे सक्तमजुरी

Published On: May 18 2018 1:13AM | Last Updated: May 17 2018 11:48PMनगर : प्रतिनिधी

जामखेड रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असताना पकडण्यात आलेल्या सहाजणांच्या टोळीला जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी काल (दि.17) हा निकाल दिला.

विकास पोपट वेदपाठक, राजू नाना गरडकर, सचिन बन्सी काळे, राहुल सुरेश समुद्र, दिगंबर जालिंदर काळे व अजय शाम पवार, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, 25 ऑक्टोेबर 2014 रोजी पहाटे चार वाजता परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक प्रांजली सोनावणे यांनी पोलिस उपनिरीक्षक एस. आय. बेंद्रे यांना इतर पोलिसांसह कर्जत फाटा येथे नाकाबंदी करण्यासाठी पाठविले होते. ही नाकाबंदी सुरु असताना जामखेडकडून एक पांढर्‍या रंगाची इंडिका कार भरघाव वेगाने आली. गाडीच्या चालकास थांबण्याचा इशारा केला असता, गाडी न थांबता कर्जत रस्त्याने जाऊ लागली.

पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. पाटोदा गावाच्या ओढ्यावर गाडीसमोर पोलिसांनी जीप आडवी लावून गाडी थांबविली. यावेळी गाडीत सहाजण होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी पंच बोलावून त्यांच्यासमोर गाडीची झडती घेतली. त्यावेळी डिकीमध्ये तलवार, गज, अ‍ॅडजस्टेबल पान्हा, काठ्या व मिरची पूड मिळून आली. पंचनामा पूर्ण करून आरोपींविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात भादंवि 399, 402 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

यासंदर्भात दाखल खटल्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश सातभाई यांच्यासमोर  सुनावणी घेण्यात आली. त्यांनी सर्व 6 आरोपींना दोषी धरून भादंवि कलम 399 प्रमाणे दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम 402 प्रमाणे दीड वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत. खटल्यात फिर्यादी शामसुंदर जाधव, पंच छगन कात्रजकर व पोलिस उपनिरीक्षक बेंद्रे यांच्या साक्षी न्यायालयाने ग्राह्य धरल्या. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पहिले.