Mon, May 20, 2019 20:30होमपेज › Ahamadnagar › सहाशे एकर जंगल जळून झाले खाक

सहाशे एकर जंगल जळून झाले खाक

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:37AMकर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील 600 एकर जंगल आगीत जळून खाक झाले. या आगीमध्ये जंगलातील सर्व झाडे, वन्यजीव जळून गेले असून या प्रकरणाची चौकशी होऊन संबधित वनअधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

कर्जत तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र अनेक भागामध्ये आहे. यामध्ये काही क्षेत्र रेहेकुरी अभयारण्य क्षेत्रात येते. काही कर्जत, तर काही मिरजगाव वनविभागाच्या हद्दीत येते. तालुक्यातील कोरेगाव, हंडाळवाडी व कापरेवाडी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल असलेल्या परिसरास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावली. हवेमुळे ही आग सर्वत्र पसरत गेली. या आगीने दोन दिवस जंगल जळत होते. त्यामुळे जंगलामध्ये असलेली हजारो झाडे, छोट्या वनस्पती, गवत आणि सरडे, साप, विंचू, किडे-मुंग्या, ससे, खारूटी, हरिण, कोल्हे, लांडगे, मुंगूस असे अनेक वन्यजीव मृत्यूमुखी पडले आहेत. 

जाळ रेषेचा विसर

उन्हाळा सुरू झाला की वनविभागाला जंगलास आग लागू नये म्हणून जगलांच्या कडेच्या सर्व बाजूने चर खोदणे व जाळ रेषा तयार करून तेथे असलेले गवत जाळून टाकणे, हे नियमित काम आहे. त्यामुळे कोणी आग लावण्याचा प्रयत्न केला, तरी जाळ रेषेमुळे जंगल सुरक्षित राहते. मात्र कोरेगाव, हंडाळवाडी, व कापरेवाडी या जंगल परिसरामध्ये अशी जाळ रेषा घेतली गेली नाही. त्यामुळे जंगलास आग लागली व मोठे नुकसान होऊन वन्यजीवांना आपला जीव गमावावा लागला आहे.

वनमंत्र्यांचा वृक्षारोपणाचा संकल्प संकटात

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे अभियान सुरू केले आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. याची जाहिरात टिव्ही व वृत्तपत्रामधून वनविभाग करीत असताना कर्जत तालुक्यातील हजारो झाडे वनअधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे जळून गेली. त्यामुळे वनमंत्र्यांंचा संकल्प संकटात आला आहे.