होमपेज › Ahamadnagar › पोलिस ठाण्यात आणली सराफाची अंत्ययात्रा

पोलिस ठाण्यात आणली सराफाची अंत्ययात्रा

Published On: Aug 19 2018 1:27AM | Last Updated: Aug 19 2018 12:28AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

पोलिसांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केलेल्या गोरक्ष दिगंबर मुंडलिक यांचा शुक्रवारी (दि. 17)  उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या सराफ व्यावसायिकांनी त्यांचा मृतदेह श्रीरामपूर पोलिस ठाण्यात आणून, सुमारे अडीच तास ठिय्या आंदोलन केल्याने वातावरण चिघळले होते. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संबंधित घटनेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्याचे लेखी देत, या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर पोलिस ठाण्यातून मृतदेह हलविण्यात आला.

संगमनेर येथील पोलिसांनी श्रीरामपूर येथील सराफ मुंडलिक यांच्यावर चोरीचे सोने खरेदी केल्याचा आरोप केला होता. हे पोलिस पथक 1 ऑगस्ट रोजी मुंडलिक यांच्याकडे सोने रिकव्हरीसाठी आले होते. त्यावेळी मुंडलिक यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या 17 दिवसांपासून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला.

शवविच्छेदनानंतर शनिवारी (दि. 18) दुपारी मुंडलिक यांचा मृतदेह श्रीरामपूर येथे आणण्यात आला. काळाराम मंदिरापासून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. मेनरोड मार्गे ही अंत्ययात्रा सोनार लेन येथे नेण्यात आली. मुंडलिक यांच्या दुकानासमोर काही वेळ अंत्ययात्रा थांबविण्यात आली. त्यानंतर शिवाजीरोड मार्गे अंत्ययात्रा पोलिस ठाण्यासमोर आणण्यात आली. 

त्यानंतर सराफ   व्यावसायिकांनी मुंडलिक यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणार्‍या पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तब्बल तीन तास पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.   या आंदोलनात खा. सदाशिव लोखंडे,  आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, नगर सराफ असोसिएशनचे संतोष वर्मा, मनोज चिंतामणी, सोमनाथ महाले, नगरसेवक दिलीप नागरे, अनिरूध्द महाले तसेच जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर आंदोलक ठाम होते. यानंतर खा. लोखंडे यांनी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून संबंधित  अधिकारी व कर्मचार्‍यांचे निलंबन करून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांच्याशीही ना. केसरकर यांनी चर्चा केली. अखेर संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे तसेच मयत मुंडलिक यांच्या कुटुंबीयांचे लेखी जबाब घेण्याचे लेखी आश्‍वासन वाघचौरे यांनी दिल्यानंतर मृतदेह या ठिकाणाहून हलविण्यात आला. येथील अमरधामाध्ये शोकाकुल वातारणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, या घटनेस कारणीभूत असलेला एक अधिकारी व तीन पोलिस, अशा चारजणांना तत्काळ निलंबित केले जाईल. या घटनेतील आरोपींना नवसारी येथे गुन्हा करताना अटक केलेली आहे. चौकशीअंती त्यांनी संगमनेर येथेही गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगमनेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेले सोने श्रीरामपूर येथे मयत मुंडलिक यांना विकल्याचे सांगितले. त्यामुळे संगमनेरचे पथक मुंडलिक यांच्याकडे गेले होते. जिल्ह्यातील कारवाई असतानाही संबंधित पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यास काहीही कळविले नाही. परंतु, याबाबतची माहिती त्यांनी पोलिस अधीक्षक तसेच अपर पोलिस अधीक्षक यांना दिली होती. आरोपी मुस्लिम इराणी (रा. श्रीरामपूर) याला घेऊन संगमनेरचे पोलिस श्रीरामपुरात आले होते. या आरोपीबरोबर निसार शेख, अकबर पठाण, कंबर इराणी (सर्व. रा. श्रीरामपूर) यांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच आरोपी मुस्लिम इराणी या आरोपीने पोलिसांना खोटी माहिती दिली असेलतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 
जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखाना पोलिस ठाण्याचे संपत शिंदे, शहर पोलिस ठाण्याचे श्रीहरी बहिरट आदींनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.