Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Ahamadnagar › प्रशासनाची आरोग्य केंद्रांबाबत उदासिनता

प्रशासनाची आरोग्य केंद्रांबाबत उदासिनता

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 11:08PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी माळवाडगाव व निमगाव खैरी आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर बेलापूर व उंदिरगाव येथील रूग्णवाहिकाही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याने आरोग्य केंद्र व तेथील रुग्णवाहिकांविषयी प्रशासनाची उदासिनता दिसून येत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या इतर सुविधेबरोबर रूग्णवाहिका सेवा ही महत्वाची व अत्यावश्यक सुविधा आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेबाबत प्रशासनाची असलेली उदासिनताच रूग्णांसाठी धोकादायक बनत आहे. 
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा शासनाचा उद्देश आहे. त्यादृष्टीने तालुक्यात बेलापूर, पढेगाव, टाकळीभान, उंदिरगाव, खैरी निमगाव व माळवाडगाव या 6 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तर तालुक्यातील इतर गावात 30 ठिकाणी उपकेंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. याठिकाणी रूग्णवाहिकीचेही उपलब्धतात तितकीच आवश्यक आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासनस्तरावरून कोट्यावधी रूपये खर्च केले जाते. तरी देखील प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत असल्याने शासन योजनांबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात येेते. त्यामुळे शासनाकडून याठिकाणी सर्व सुविधा पुरविण्यात येेते. असे असतानाही माळवाडगाव व खैरी निमगाव याठिकाणी रूग्णवाहिका सेवाच उपलब्ध नाही तर बेलापूर येथील रूग्णवाहिकाही नादुरूस्त असल्याने नाशिक येथील विभागीय कार्यशाळेत ती दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.

तसेच उंदिरगाव येथील रूग्णवाहिकेत किरकोळ बिघाड झाल्याचे समजते. यावरून  नागरिकांच्या अत्यावश्यक सुविधेबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आवश्यक त्याठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध करून देऊन रूग्णवाहिकेच्या देखभालीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत ग्रामीण भागातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रुग्णांना मोफत उपचार मिंळावेत, यासाठी शासन आग्रही असते. त्याचा सामान्य नागरिकांना लाभही मिळतो. मात्र रुग्णवाहिका ही देखील महत्वाची असल्याने याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात महिलांचे बाळंतपण, शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचारासाठी रुग्णांना वेळेवर उपचार मिळणेकामी रुग्णवाहिका गरजेची बनलेली आहे.