Mon, May 20, 2019 22:08होमपेज › Ahamadnagar › तंत्रज्ञानामुळे देशाची प्रगती ः मेंगवडे

तंत्रज्ञानामुळे देशाची प्रगती ः मेंगवडे

Published On: Dec 18 2017 2:27AM | Last Updated: Dec 18 2017 12:35AM

बुकमार्क करा

श्रीरामपूर : प्रतिनिधी

कार्यक्षमता वाढविण्यासाठी संगणकाच्या वापरामुळे नोकर्‍यांवर गदा येईल, म्हणून ऐशींच्या दशकाच्या सुरुवातीला भारतामध्ये या तंत्रज्ञानावर बंदी होती. मात्र, 1984 साली स्वर्गीय राजीव गांधी यांनी संगणक धोरण जाहीर केले. आज कॅशलेस व्यवहारापर्यंतच्या झालेल्या प्रगतीचे आपण साक्षीदार आहोत, असे सांगताना तंत्रज्ञानामुळे इतक्या गोष्टी स्वयंचलित झाल्या की, त्यावर आपला विश्‍वासही बसत नाही. आता इंटरनेट ऑफ थिंग्स (आय. ओ. टी.) या नव्या तंत्रज्ञानाचा उंबरठ्यावर आपण उभे आहोत. ज्यामध्ये मशीनचा मशीनशी संवाद होऊन  मानवाची कित्येक कामे सहजसोपी होणार असल्याचे ओपस सॉप्टवेअर  सोल्युशनचे अध्यक्ष रमेश मेंगवडे यांनी पद्मश्री विखे पाटील स्मृति- व्याख्यानमालेत ‘यशोगाथा’  या विषयावर बोलताना सांगितले.

सात दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेचा काल समारोप झाला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के अध्यक्षस्थानी होते.  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक के. पी. नाना आहेर, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. शिवाजी रेठरेकर, डॉ. प्रिया राव, कर्नल सुरेंद्र कुमार सिंग, कर्नल भारतकुमार, प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे, ऋषिकेश औताडे आदी उपस्थित होते.  श्रीगोंदा तालुक्यातील रहिवाशी असलेले मेंगवडे यांनी शिक्षण संपल्यानंतर विक्रम साराभाई सेन्टर मध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर स्वतः हार्डवेअर आणि सॉप्टवेअर या क्षेत्रात आपला उद्योग सुरू केला.जागतिक दर्जाच्या उत्पादनाची निर्मिती करताना पंधरा वर्षांत दोन हजार संगणक अभियंत्यांना बरोबर घेऊन शून्यातूनन सुरूवात करून त्यांनी आठशे कोटींपर्यंत उलाढाल केली.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीबद्दल बोलताना ते म्हणाले की,  तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग आज इतका जास्त आहे की,  आपण जे बोलतोय ते सगळ अस्तित्त्वात येतंय तेही एका क्लिकने. संगणकाच्या साह्याने खेळ, अभ्यास, सिनेमे, गप्पागोष्टी, सामानाची खरेदी-विक्री अगदी काय वाट्टेल ते केले जात आहे. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपनीमार्फत आपण जिथे हवी तिथे एखादी वस्तू ज्या जागी असू तिथून ऑर्डर करू शकतो. अपेक्षित वेळेत ती आपल्याकडे हजर होते. त्यात दोष असेल, तर परत घेतली जाते आपण चुकून दुसर्‍या एखाद्या व्यक्तिबरोबर नाही,तर मशीनसोबत राहत असल्याची जाणीव झाली तर अशक्य नाही. परंतु जे सोपं होत चाललयं त्याच मोकळ्या मनाने स्वागत करायचं आणि प्रगतीच्या वेगात सहभागी व्हायचं, हे आत्ताच्या पिढीसमोर खरे आव्हान असणार आहे. प्रारंभी डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रास्तविक केले. प्रा. डॉ. रामचंद्र रसाळ यांनी आभार मानले. यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.