Mon, Jul 22, 2019 01:19होमपेज › Ahamadnagar › विभाजनाचा अहवाल पाहिला नाही

विभाजनाचा अहवाल पाहिला नाही

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:41AMश्रीरामपूर  : प्रतिनिधी

पालकमंत्री हे जिल्ह्याचे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे ना. शिंदे यांना जिल्हा विभाजन हवे असेल तर ते नक्कीच होईल. मात्र मला याचा अभ्यास करावा लागेल. यासाठी काही प्रक्रियाही असतात. मी अद्याप हा अहवाल पाहिला नाही. मात्र, जिल्हा विभाजनासाठी सरकार सकारात्मक राहील, अशी ग्वाही महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  देवळाली प्रवरा येथे आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठाण आणि नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषि प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे तर व्यासपीठावर शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर कदम, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. मोनिकाताई राजळे, आ. भाऊसाहेब कांबळे, प्रा. भानुदास बेरड, डॉ. मुकुंदराव तापकिर आदी उपस्थित होते. 

ना. पाटील म्हणाले, सत्यजित कदम यांच्या रुपाने देवळालीला तरूण आणि बुद्धीवान नगराध्यक्ष मिळाला आहे. त्यांनी आग्रह धरलेला  पुणतांबा फाटा ते श्रीरामपूर, बेलापूर, देवळाली, ताहराबाद व पुढे साकूर मांडवा या रस्त्याचे चौपदरीकरण, लाख- पढेगाव पूल व इतर सर्व कामे  मार्गी लावण्याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी जलसंधारणाचे महत्व, समूह शेती, शेतकरी कंपनी, शासनाच्या नवनवीन योजना इत्यादींची माहिती देवून शेतीचे उत्पादन वाढवणे, त्याला चांगला भाव देणे व त्यातून गाव आणि तेथील माणसं श्रीमंत करण्याचे सरकारचे स्वप्न आहे. त्यामुळे शेतकरी सुखी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 

जिल्हा विभाजनाबाबत म्हणाले की, सरकारचे छोटे राज्य व छोटे छोटे जिल्हा, तालुका निर्मितीचा अजेंडा आहे. पालकमंत्र्यांसह तुमच्या सर्वांचे विभाजनाचे स्वप्न आहे. मात्र त्यासाठी अभ्यास करावा लागले, काही प्रक्रिया असते, त्यानंतर याकामी आवश्यक असलेला 500 कोटींचा निधीही सरकार उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले. ना. शिंदे म्हणाले, जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. गेल्या 25 वर्षापासून हा प्रश्‍न प्रलंबित आहे. जिल्ह्याला तीन-तीन मंत्री असतानाही त्यांचे मुख्यालयाबाबत एकमत झाले नाही, मात्र आता सरकार आपले आहे व जिल्ह्याला मंत्रीही एकच आहे. त्यामुळे मी हा प्रश्‍न गंभीरतेने घेतला असल्याचे सांगून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा विभाजन झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी ना. चंद्रकांत पाटलांकडे केली. यावेळी तरूण, तडफदार अशा शब्दालंकारांचा वापर करत सत्यजित कदम यांचे तोंडभरून कौतूक करण्यासही ते विसरले नाहीत.

माजी आ. कदम यांनी सर्वात मोठी कर्जमाफी देणारे हे सरकार शेतकर्‍यांचे असल्याचे सांगून देवळाली परिसरातील सर्वच रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळावा, लाख-पढेगाव पुलाचे काम मार्गी लावावे व नगर जिल्ह्याचे विभाजन होवून श्रीरामपूर नवीन जिल्हा व देवळाली प्रवरा तालुका करावा, अशी आग्रही मागणी केली. यावेळी. माजी आ. कदम यांच्या हस्ते ना. पाटील यांना तसे निवेदन देण्यात आले.
राजश्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी ना. चंद्रकांत पाटलांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तत्पूर्वी, नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले,  माजी आ. चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने 17 पुरस्कार प्राप्त केले आहेत. पालकमंत्री ना. शिंदे यांनी निवडणूक काळात देवळालीची सत्ता भाजपाकडे द्या, पाहिजे तेवढा निधी देतो, असा शब्द दिला होता. याची आठवण करून देताना आज पोकलेन मशीनचा लोकार्पण सोहळा झाला आहे. यामाध्यमातून देवळाली परिसरातही कर्जत-जामखेडप्रमाणे  जलसंधारण कामे करून हा भाग नंदनवन केला जाईल, त्यासाठी पालकमंत्र्यांनी डिझेलची व्यवस्था करून द्यावी, तसेच पुणतांबा ते देवळाली मार्गे साकूर मांडवा रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी केली.  आभार उपनगराध्यक्ष संसारे यांनी मानले. 

मराठा आरक्षणाप्रमाणे विभाजनही रेंगाळणार ?

देवळाली प्रवरा येथील शेतकरी मेळाव्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील येणार असल्याने जिल्हा विभाजनाचा विषय आठ दिवसांपासून  चर्चेत होता. पालकमंत्री ना. शिंदे यांनी त्याची पायाभरणीही केली होती. त्यामुळे कालच्या मेळाव्यात जिल्हा विभाजनावर शिक्कामोर्तब होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात महसूलमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची ‘री’ ओढत जिल्हा विभाजनाबाबत अभ्यास करावा लागणार असल्याचे सांगितल्याने मराठा आरक्षणप्रमाणे या मुद्दाही रेंगाळणार का ? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.