Wed, May 22, 2019 17:16होमपेज › Ahamadnagar › छिंदमच्या राजीनाम्याची पोलिस चौकशी!

छिंदमच्या राजीनाम्याची पोलिस चौकशी!

Published On: Jul 22 2018 1:03AM | Last Updated: Jul 22 2018 12:01AMनगर : प्रतिनिधी

माझा उपमहापौर पदाच्या दिलेला राजीनामा बनावट असून, त्यावर केलेली स्वाक्षरी खोटी आहे. त्यामुळे सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिस ठाण्यात केली आहे. या तक्रार अर्जाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर सही खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होईल, असे सूत्रांनी सांगितले

उपमहापौर पदाचा दिलेला राजीनामा खोटा असून, त्यावर केलेली सही माझी नाहीच. मी राजीनामा दिलेला नाही. अटकेत असताना माझा राजीनामा महापालिकेत गेलाच कसा? त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून खोटी स्वाक्षरी करणार्‍यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असा तक्रार अर्ज श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिस ठाण्यात केला आहे. त्या अर्जावरून तोफखाना पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

छिंदम याचा राजीनामा महापालिकेत एका बड्या राजकीय नेत्याच्या नातेवाईकाने सादर केल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधितासही चौकशीस सामोरे जावे लागू शकते. चौकशीत पोलिसांकडून छिंदम याच्या हस्ताक्षराशी राजीनाम्यातील अक्षर जुळते की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अक्षरांचे नमुने तपासणीसाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात येतील. छिंदम याने राजीनामाप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने हे राजीनामा प्रकरण चांगलेच गाजण्याची चिन्हे आहेत.

मनपा प्रशासनाकडून माहिती मागविणार

छिंदम याचा राजीनामापत्राबाबत महापालिका प्रशासनाला सोमवारी पत्र पाठविण्यात येणार आहे. मंजूर केलेल्या राजीनाम्याची सत्यप्रत व राजीनामा कोणी दिला, याबाबत माहिती मागविण्यात येणार आहे, असे तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले आहे.