Sun, Feb 17, 2019 07:05होमपेज › Ahamadnagar › श्रीपाद छिंदम.. मु.पो. नाशिक!

श्रीपाद छिंदम.. मु.पो. नाशिक!

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 18 2018 1:54AMनगर : प्रतिनिधी

शिवजयंती व शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या उपमहापौर श्रीपाद छिंदम याला शनिवारी (दि. 17) सकाळी उपकारागृहात दाखल केल्यानंतर काही वेळातच गोंधळ उडाला. इतर कैद्यांनी मोठ्याने आरडाओरड करून त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रात्री उशिरा त्याला नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले, अशी माहिती कारागृह सूत्रांनी दिली.

काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उपमहापौर छिंदम याला नगरच्या उपकारागृहात दाखल करण्यात आले. तो आतमध्ये दाखल होताच इतर कैद्यांनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याने कारागृह प्रशासनाची  धावपळ सुरू झाली. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून छिंदम याला तातडीने स्वतंत्र बराकीत हलविले. त्यानंतर कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांनी कारागृह विभागाच्या अन्य कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांच्याशी छिंदम याला इतरत्र हलविण्याबाबत चर्चा केली. 

सायंकाळी छिंदम याला नाशिक येथे हलविण्याबाबतचा आदेश नगर उपकारागृह प्रशासनास प्राप्त झाला. त्यानंतर रात्री चोख पोलिस बंदोबस्तात कारागृह अधिकार्‍यांच्या उपस्थितीत छिंदम याला नाशिकला हलविण्यात आले. छिंदम याचा मुक्काम काही दिवस नाशिकमध्ये राहणार आहे. 

मारहाण नव्हे, फक्त घोषणाबाजी

उपकारागृहात छिंदम आल्यानंतर काही कैद्यांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली. मारहाणीचा प्रकार घडलेला नाही. घोषणाबाजीची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यांच्यांशी सुरक्षेच्या कारणास्तव छिंदम याला दुसरीकडे हलविण्याबाबत चर्चा करण्यात आली.    - नागनाथ सावंत अधीक्षक, उपकारागृह, नगर