Mon, Jun 17, 2019 03:11होमपेज › Ahamadnagar › छिंदमला न्यायालयीन कोठडी

छिंदमला न्यायालयीन कोठडी

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:22PMनगर : प्रतिनिधी

शिवजयंती व शिवरायांबद्दल आक्षेपार्ह व्यक्‍तव्य करणारा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला शनिवारी (दि. 19) दुपारी न्यायालयात आणल्यास नागरिकांची मोठी गर्दी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी अतिशय पद्धतधीरपणे नियोजन करून सकाळी साडेआठ वाजताच आरोपीला न्यायालयात हजर केले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अवघ्या दहा मिनिटांत कामकाज आटोपले व नऊ वाजण्यापूर्वीच छिंदम याला उपकारागृहात दाखल करण्यात आले.

शुक्रवारी रात्री नगर-सोलापूर रस्त्यावरील शिराढोण परिसरात छिंदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अटक केल्यानंतर ही बातमी वार्‍यासारखी पसरली. अटक केलेल्या छिंदम याला शनिवारी न्यायालयात आणले जाणार होते. त्यामुळे शनिवारी जिल्हा न्यायालयाच्या आवारात जमण्याचे आवाहन करणारे अनेक शिवप्रेमी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे संदेश सोशल मीडियावर फिरू लागले. त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात कितीही पोलिस बंदोबस्त तैनात केला, तरी मोठ्या जनसमुदायासमोर पोलिसांचा बंदोबस्त तोकडा पडण्याची शक्यता होती.

त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असता. ही बाब लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काही निवडक पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात सकाळी लवकरच आरोपीला न्यायालयात नेण्यात ठरविण्यात आले. त्यासाठी न्यायालयाशीही संपर्क साधण्याची आवश्यकता होती. पोलिस अधीक्षकांनी प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली व तीन-चार अधिकारी वगळता इतरत्र कुणालाही ही बाब कळणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. 

ज्या अधिकार्‍याकडे न्यायालयाचे कामकाज सकाळी लवकर व्हावे, याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, ते अधिकारी रात्रीच कामाला लागले. त्यांनी सरकारी वकील व न्यायालय प्रशासनाशी संपर्क साधून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सकाळी लवकर न्यायालयाचे कामकाज घेण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करण्यात आली. ही बातमी अधीकांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, तोफखान्याचे निरीक्षक सुरशे सपकाळे यांच्यासह इतर काही निवडक अधिकार्‍यांपुरती मर्यादीत ठेवली. कर्मचार्‍यांना समजणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.

निरीक्षक पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व कर्मचार्‍यांना मोठी कारवाई करण्यासाठी जायचे आहे, असे सांगून सकाळी साडेसहा वाजताच सर्वांना बोलावून घेतले. सकाळी लवकरच नियोजनातील सर्व अधिकारी कामाला लागले. न्यायालय आवारात कँप पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांची सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवला होता. न्यायाधीश व सरकारी वकील हे न्यायालयात आल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर सव्वाआठ वाजता छिंदम याला पोलिस कोठडीतून बाहेर काढण्यात आले. साध्या वेशात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्तात त्याला पोलिसांच्या वाहनात बसविले. त्यामुळे बाहेरील व्यक्तीला काही समजले नाही. फक्त पोलिस कर्मचार्‍यांनाच आपण छिंदम याला घेऊन न्यायालयात जात असल्याचे समजले. त्यांनीही याबाबत कमालीची गुप्तता पाळली.

सकाळी साडेआठ वाजता श्रीपाद छिंदम याला घेऊन पोलिस न्यायालयात दाखल झाले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कानगुडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. काकासाहेब कौठुळे यांनी म्हणणे सादर केले. छिंदम याच्या वतीने कोणीही वकीलपत्र घेतलेले नव्हते. ‘छिंदम याच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखाविण्यासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. शिवजयंतीचा बंदोबस्त असल्याने कायदा-सुव्यवस्थेत पोलिस व्यस्त राहतील. त्यामुळे पोलिस कोठडी मागण्याचा हक्क राखून ठेवत, आरोपी छिंदम याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने छिंदम याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अवघ्या दहा मिनिटांच्या आतमध्ये न्यायालयातील सर्व कामकाज आटोपले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत.