Sun, Apr 21, 2019 06:07होमपेज › Ahamadnagar › विरोध असूनही खासदार गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!

विरोध असूनही खासदार गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 9:22AMनगर : प्रतिनिधी

श्रीपाद छिंदम यांना उपमहापौराची उमेदवारी देण्यासाठी पक्षातील निष्ठावंतांचा विरोध असतांनाही खा. दिलीप गांधी यांनी प्रदेश सरचिटणीसांकडे प्रतिष्ठा पणाला लावली होती, असा घाणाघाती आरोप आगरकर गटाने खा. गांधी यांच्यावर केला आहे. खा. गांधी यांनी याआधीही वैचारिक दिवाळखोरीच्या लोकांना पक्षात मोठेपणा दिला आहे. त्याचा फटका पक्षाला बसत असल्याचा दावा करत खा. गांधी यांनीही शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आगरकर गटाने केली आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले की, छिंदम यांचा केवळ उपमहापौर पदाचा राजीनामा घेवून चालणार नाही. त्यांचा नगरसेवक पदाचाही राजीनामा घेतला जाईल.  त्यांना पक्षातील सर्व पदांवरुन दूर करण्याची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करणार आहोत.  निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून वैचारिक दिवाळखोरीच्या लोकांना खा. गांधींनी पक्षात स्थान दिल्याने पक्षाला फटका सहन करावा लागत आहे. उपमहापौर पद देण्यासाठी त्यांनीच प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अभय आगरकर, सदाशिव देवगांवकर, दत्ता कावरे, उषा नलवडे, मिलिंद गंधे, नरेंद्र कुलकर्णी, प्रविण ढोणे, सचिन पारखी, मुकुल गंधे आदींसह आगरकर समर्थकांनी केली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याकडे कार्यकारिणी बरखास्तीची मागणी करण्यात आली असून तसे न झाल्यास पक्षाला मोठ्याप्रमाणात अपयशाचा सामना करावा लागेल, असा दावाही पत्रकात करण्यात आला आहे.