होमपेज › Ahamadnagar › ...अन् छिंदम प्रकरणी पोलिसही आले बुरख्यात!

...अन् छिंदम प्रकरणी पोलिसही आले बुरख्यात!

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 10 2018 2:09AMनगर : प्रतिनिधी

आरोपी श्रीपाद छिंदम याला गुरुवारीच दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेत नगरला आणले होते. परंतु, कायदा-सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता गृहीत करून पोलिसांनी माहिती गोपनीय ठेवली. शुक्रवारी (दि. 9) सकाळी आरोपी छिंदम याला न्यायालयात आणताना त्याच्या तोंडावर बुरखा घातला होता व त्याच्यासोबत आणखी तीन पोलिस कर्मचार्‍यांच्याही तोंडावर बुरखा घातला. बुरख्यात चार जण पोलिस वाहनातून न्यायालयात गेले. त्यामुळे कोणालाही संशय आला नाही. 

अर्ध्या तासात न्यायालयीन कामकाज आटोपले व छिंदम याला पोलिस बंदोबस्तात नाशिकला रवाना करण्यात आले. त्यानंतर बर्‍याच वेळाने छिंदमला न्यायालयात आणले होते, अशी बातमी पसरली. त्यामुळे कोणताही वादाचा प्रसंग उद्भवला नाही. 

याबाबत माहिती अशी की, आरोपी श्रीपाद छिंदम हा धार्मिक भावना दुखाविल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत तो नाशिक रोड कारागृहात होता. या गुन्ह्यात पोलिसांनी पोलिस कोठडी मागण्याचा हक्क राखून ठेवला होता. तसेच त्याच्याविरुद्ध महापालिका कर्मचारी अशोक बिडवे यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. त्याला या गुन्ह्यात वर्ग करण्याचा मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. गेल्या आठवड्यात न्यायालयाने त्याला वर्ग करण्याचा आदेशही दिला होता. परंतु, धूलिवंदन, शिवजयंती बंदोबस्तामुळे पोलिसांनी वर्ग करून घेण्यास मुदत मागितली होती. 

गुरुवारी (दि. 8) सकाळी तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी अतिशय गोपनीयरित्या एक अधिकारी व चार-पाच कर्मचार्‍यांचे विशेष पथक छिंदमचा ताबा घेण्यासाठी नाशिकला पाठविले. त्याच दिवशी तोफखाना पोलिसांनी पथदिवे घोटाळ्यातील आरोपी मनपा प्रभारी उपायुक्त व कॅफोला अटक केली होती. तसेच फरार आरोपी रोहिदास सातपुते याच्या फार्म हाऊसची झडती घेतली. या दोन्ही मोठ्या कारवाईंमुळे कोणालाही छिंदम प्रकरणाची आठवणही झाली नाही. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी छिंदम याला एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कोठडी ठेवले. रात्री गुन्ह्याच्या अनुषंमाने काही बाबींचा तपासही केला. शुक्रवारी सकाळी लवकरच त्याला न्यायालयात नेण्याचे नियोजन करण्यात आले. 

पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखाना निरीक्षक सपकाळे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी आरोपी छिंदम याला एमआयडीसीच्या पोलिस कोठडीतून ताब्यात घेतले. त्याच्या चेहर्‍यावर काळा बुरखा टाकण्यात आला. तसेच त्याच्यासोबत आणखी तीन पोलिस कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावरही काळा बुरखे टाकण्यात आले. काळ्या बुरख्यात चार जण होते. त्यामुळे कोणालाही कसलाच संशय आला नाही. पावणेदहा वाजता छिंदम याला न्यायालयाच्या आवारात आणण्यात आले. तेथून चार बुरखाधारी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायदान कक्षाजवळ गेले. दहा वाजता कामकाज सुरू होत नसल्याने न्यायालयात वकील, कर्मचारी, अशिलांची गर्दी नव्हती. न्यायदान कक्षाबाहेर बुरखा काढून छिंदम याला न्यायदान कक्षात नेण्यात आले. त्याची पत्नी आधीच न्यायालयात येऊन थांबलेली होती. दोघांची चर्चा झाली. यावेळी छिंदम याने स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज लिहिला. अर्जांवर स्टँप चिकटविण्यात आले. न्यायालयीन कामकाज अर्धा तासात आटोपले. 

न्यायदान कक्षातून बाहेर आणल्यानंतर छिंदम याच्या तोंडावर बुरखा टाकण्यात आला. त्यानंतर इतर तीन कर्मचारीही बुरख्यात होते. त्पोलिस बंदोबस्तात त्याला नाशिक रोड तुरुंगाच्या दिशेने हलविण्यात आले. जामीन मंजूर झाल्याचा आदेश झाल्यानंतर छिंदम याला न्यायालयात आणल्याचे वृत्त शहरात पसरले. परंतु, त्याच्या बराच वेळ आधी त्याला बाहेर नेण्यात आलेले होते. पोलिसांनी अतिशय नियोजनबद्धरित्या ‘चकवा’ देऊन न्यायालयीन कार्यवाही पूर्ण केली.