Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Ahamadnagar › अपहृत बालकाचा आढळला मृतदेह

अपहृत बालकाचा आढळला मृतदेह

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 05 2017 12:35AM

बुकमार्क करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील भिंगाण येथून 21 दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या वैभव पारखे (5) या बालकाचा मृतदेह रविवारी त्याच्या घरापासून काही अंतरावर सापडला आहे. मुलाच्या अंगावर असणार्‍या शर्ट व पँटवरून हा मृतदेह वैभवचाच असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अधिक खातरजमा करण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. वैभव पारखे हा 17 नोव्हेंबर रोजी घरासमोर खेळताना गायब झाला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी वैभवचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. वैभवचे नेमके  काय झाले, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असतानाच, काल सकाळी घरापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहाच्या अंगावर असणार्‍या शर्ट आणि पँटवरुन हा मृतदेह वैभव याचाच असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. वैभवचा मृत्यू नेमका कशाने झाला, त्याचा खून करण्यात आला का? या सर्व प्रश्‍नांचा उलगडा शवविछेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर होऊ शकणार आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले की, शर्ट आणि पँटवरुन हा मृतदेह वैभव याचा असल्याची खात्री झाली असली तरी, डीएनए चाचणी करून खातरजमा केली जाणार आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमका काय प्रकार आहे, हे समजू शकेल. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव करत आहेत. 
कुणाला समजले कसे नाही? 

वैभव जवळपास 21 दिवसांपासून गायब आहे. काल सकाळी घरापासून काही अंतरावर काटेरी झुडूपाच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी लोकवस्तीही आहे. मग इतक्या दिवसात हा मृतदेह कुणाला कसा दिसला नाही आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी पोलिस पथक अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्या निदर्शनासही हा मृतदेह कसा आला नाही? यावरून हा मृतदेह एक-दोन दिवसांपूर्वी आणून टाकला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.