Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Ahamadnagar › लग्नाच्या अमिषाने शाळकरी मुलीचे श्रीगोंद्यात अपहरण

लग्नाच्या अमिषाने शाळकरी मुलीचे श्रीगोंद्यात अपहरण

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 10:56PM

बुकमार्क करा
श्रीगोंदा : प्रतिनिधी 

6 जानेवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास  एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले. श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपिस ताब्यात घेत अपहरण केलेल्या मुलीची उरुळी कांचन (पुणे) येथून सुटका केली.  या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी आरोपी लखन चव्हाण (वय 24) याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेली  माहिती अशी :  पंधरा वर्षीय शाळकरी मुलगी शनिवारी सकाळी आठ वाजता शाळेत जाते असे सांगून घरातून बाहेर गेली. आरोपी चव्हाण याने  मुलीला शाळेतून बाहेर बोलावत तिला लग्नाचे आमिष दाखवले.  तिला वाहनावर बसविले आणि उरूळी कांचन येथे आपल्या  खोलीवर नेऊन ठेवले.  

सायंकाळ होऊनही मुलगी घरी न आल्याने मुलीच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यानी अधिक तपासासाठी एक पथक चांडगाव येथे पाठविले. सहायक पोलिस निरिक्षक नीलेश कांबळे, पोलिस कर्मचारी प्रकाश वाघ, दादासाहेब टाके, उत्तम राउत यानी गावात अधिक चौकशी केली. त्यात आरोपी चव्हाणचे नाव समोर आले.

दरम्यान, लखन हा गावात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. मात्र त्याने उडवा-उडवीची उत्तर दिली. त्याच्या खिशात सापडलेल्या दोन व्यक्तींच्या तिकीटावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. पोलिस ठाण्यात आणताच तो पोपटासारखा बोलू लागला. आपणच त्या मुलीला फूस लावून पळवून नेले असून उरुळी कांचन येथे खोलीवर ठेवल्याची कबूली दिली.  पोलिस पथकाने लागलीच उरुळी कांचन येथे जावून त्या मुलीला ताब्यात घेतले आणि नातेवाइकांच्या ताब्यात दिले. मुलीच्या नातेवाइकांच्या फिर्यादिवरुन आरोपी चव्हाणविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे करत आहेत.