Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Ahamadnagar › कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांची ओढ

कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांची ओढ

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 14 2017 1:01AM

बुकमार्क करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी

ज्या कांद्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत अश्रू आणले, तोच कांदा आता चांगलाच भाव खाऊ लागला आहे. कांद्याचे बाजारभाव वाढू लागल्याने तालुक्यातील शेतकरी चढ्या भावाने कांद्याची रोपे खरेदी करून कांदा लागवड करताना दिसत आहेत. आता मिळत असलेला भाव टिकून राहिल का?  आता जरी कांद्याला 40 रुपयापर्यत भाव मिळत असला तरी हा भाव किती दिवस टिकून राहतो, याबाबत मात्र साशंकता आहे.

गेल्या काही वर्षाची कांदा शेती पाहिली तर ती तोट्याचीच ठरली असे दिसते. मागील वर्षी तर कवडीमोल बाजार मिळाल्याने शेतकरी देशोधडीस लागला. काही शेतकर्‍यानी तर कांदा जमिनीत गाडला, रस्त्यावर फेकून दिला इतकी दैना कांदयाने केली. आज मात्र कांदयाबाबतचे चित्र बदलले आहे. बाजारात कांदा कमी झाल्याने बाजारभाव चांगलाच वाढला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील टाकली लोणार, भानगाव, ढोरजा, कोसेगव्हाण, आढळगाव ही कांद्यासाठी अग्रेसर असणारी गावे. श्रीगोंदा बाजार समितीमध्ये रविवारी साडेतीन हजार गोन्या कांद्याची आवक झाली. चांगल्या दर्जाच्या कांद्याला 35 रुपये किलोपर्यतचा भाव मिळाला.  तर काल (12)  सहा हजार पाचशे गोन्यांची आवक झाली.

काल चांगल्या दर्जाच्या कांद्याला 40 रुपये प्रती किलोपर्यतचा भाव मिळाला.कांद्याला बाजार चांगले असल्याने शेतकरी श्रीगोंदयाप्रमाणेच नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या ठिकाणी कांदा पाठवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यत तालुक्यातन चार कोटी रूपयांच्या आसपास कांदा विक्रीतुन उलाढाल झाली आहे. एकूणच कांद्याचे भाव तेजीत असल्याने शेतकर्‍यांचा कल कांदा लागवड़ीकड़े आहे. आता असलेला कांद्याचा भाव किती दिवस स्थिर राहतो हे पाहणे महत्वाचे आहे.  लागवडीचा भाव ही  वाढला

कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकर्‍यानी कपाशीची शेत नांगरुन कांदा लागवड सुरु केली आहे. मागील वर्षी एक एकर कांदा लागवडीसाठी पाच हजार रुपये लागत होते. आता एक एकर कांदा लागवडीसाठीच 6 हजार मोजावे लागत आहेत. कांदा लागवडी सोबतच रोपाचे भाव ही चांगलेच वधारले असून, एक एकर कांद्याच्या रोपासाठी 12 हजार रुपये लागत आहेत. 20 हजार हेक्टरवर कांदा लागवड बहुतांश शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. दरवर्षी बारा ते चौदा हजार हेक्टर कांद्याची लागवड होते. मात्र यंदा हे क्षेत्र 20 हजार हेक्टरच्या वर जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विश्‍वनाथ दारकुंडे यानी दिली.