Sun, Aug 25, 2019 12:28होमपेज › Ahamadnagar › मुख्याध्यापक-शिक्षक वादात शाळा 3 दिवसांपासून बंद!

मुख्याध्यापक-शिक्षक वादात शाळा 3 दिवसांपासून बंद!

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:13AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील भानगाव येथील भानेश्‍वर विद्यालयात वेळापत्रक ठरविण्यावरून शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात  वाद झाला. त्यामुळे शाळा तीन दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी विद्यालयास कुलूप ठोकले. 

दरम्यान, माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश पवार, गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद व नीळकंठ बोरूडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला.  आज (दि.20) पासून विद्यालय नियमितपणे चालू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिक्षकांना नियमाप्रमाणे काम करावेच लागणार आहे. त्यामध्ये कुचराई केल्यास सबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की  स्व. शंकरराव काळे यांनी समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून भानगाव येथे सन 1972 मध्ये विद्यालय सुरू केले. मानवसेवा संस्थेचे सचिव म्हणून सदाशिव शेळके हे काम पाहतात. 

शाळेचे मुख्याध्यापक विश्‍वनाथ शेलार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सचिव शेळके यांनी शिक्षकांची एक समिती गठीत केलेली आहे. या समितीने शाळेचे वेळापत्रक वेळेवर तयार केले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक शेलार यांनी स्वत: हे वेळापत्रक तयार केले. त्यात शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी जादा तास बसविले. पण हे वेळापत्रक शिक्षकांना मान्य झाले नाही. अन् इथेच वादाची ठिणगी पडली. 
या वादात गेल्या तीन दिवसांपासून शाळा बंदच आहे. विद्यालयात तास होत नसल्याचे समजताच काल (दि.19) ग्रामस्थांनी कार्यालयाला कुलूप लावून विद्यालय बंद केले. मुख्याध्यापक शेलार यांच्या नियोजनानुसारच विद्यालय चालेल व शिक्षकांनी गावात राहणे बंधनकारक आहे व जादा तास शिक्षकांनी घेतलेच पाहिजेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी  मांडली. या वेळी सुरेश गोरे, आबासाहेब शितोळे, प्रमोद जाधव आप्पासाहेब शितोळे, दिलीप तोरडमल, रघुनाथ कुदांडे आदी उपस्थित होते.

     
     ..तर कारवाई करणार!

भानगाव येथील शाळेमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यात वेळापत्रक ठरविण्यावरून झालेला वाद आता सामोपचाराने मिटलेला आहे. त्यामुळे बुधवार (दि.20) पासून विद्यालय नियमितपणे सुरू होईल. शिक्षकांनी ठरवून दिलेल्या कामात कुचराई केली, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी सांगितले.