होमपेज › Ahamadnagar › ‘शिवशाही’त देखील ‘आवडेल तेथे प्रवास’ 

‘शिवशाही’त देखील ‘आवडेल तेथे प्रवास’ 

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:40AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

प्रवाशांच्या सेवेसाठी किफायतशीर दरात ‘आवडेल तेथे, कुठेही प्रवास’ ही योजना साध्या व निमआराम बसेससाठी जोमात सुरु आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसव्दारे देखील प्रवाशांना ही संधी उपलब्ध करुन दिली गेली आहे. 

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती याबरोबरच माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींना महामंडळाने प्रवासदरात सवलत दिली आहे. पर्यटनासाठी तसेच सलग तीन-चार दिवसांचा प्रवास करणार्‍या व्यक्तींना देखील सवलत दिली आहे. त्यासाठी आवडेल तेथे कोठेही प्रवास ही योजना गेल्या काही वर्षांपासून जोमात सुरु आहे. ही सवलत साध्या बसेसबरोबर निमआराम बसेसमध्ये देखील उपलब्ध आहे. 

जिल्ह्यातील जामखेड, पाथर्डी,कोपरगाव, श्रीरामपूर व शिर्डी आदी आगारातून दहा शिवशाही वातानुकूलित बसेस प्रवासी सेवेसाठी दाखल झाल्या आहेत. ग्रामीण जनतेकडून देखील या शिवशाहीला प्रतिसाद मिळू लागला आहे. ‘आवडेल तेथे, कुठेही प्रवास’ ही सवलतीची योजना शिवशाही वातानुकूलित बसेसना देखील लागू करा, अशी मागणी जनतेकडून होऊ लागली. त्यामुळे महामंडळाने 5 डिसेंबरपासून ही सवलत आता शिवशाहीला बसेसना देखील लागू केली आहे. धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गस्थळांच्या पर्यटनासाठी सवलतीच्या दरात ही संधी उपलब्ध झाली. त्यामुळे प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी केले आहे.

1780 रुपयांत करा सात दिवस प्रवास

सात दिवसांसाठी शिवशाहीव्दारे प्रवाशी भाडे  गर्दीच्या हंगामामध्ये प्रौढ-1780 तर मुलांसाठी 890 रुपये तर बिगर हंगामात प्रौढ-1645 तर मुलांसाठी 825 रुपये असणार आहे. 4 दिवसांसाठीचा पास  गर्दीच्या हंगामात प्रौढ व्यक्तीला 1020 तर मुलांसाठी 510 रुपये आकारण्यात येणार आहे. बिगर हंगामात प्रौढ व्यक्तीस 940 तर मुलांसाठी 470 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.