होमपेज › Ahamadnagar › ..तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे: दिलीप गांधी 

..तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे: दिलीप गांधी 

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 1:30AMनगर : प्रतिनिधी

गेल्या  चार वर्षांपासून  राज्यात असलेल्या युती सरकारने खर्‍या अर्थाने राज्याचा विकास केला. हा विकास पाहवत नसल्याने सरकारच्या बदनामीचे षड्यंत्र रचण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडगाव हत्याकांडात मृत पावलेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सरकारवर निकम्मे असल्याची टीका प्रसिद्धीसाठी केली. जर सरकार निकम्मे आहे तर मग सत्तेतून तुम्ही का बाहेर पडत नाहीत? असा सवाल खा. दिलीप गांधी यांनी केला.

पत्रकार परिषदेत गांधी यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. यावेळी नगरसेवक किशोर डागवाले, सुवेंद्र गांधी आदी उपस्थित होते. गांधी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले आहे. स्वताकडे विकासाचा कोणताच अजेंडा नसल्याने प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी मुख्यंत्र्यांवर टीका करण्यात येत आहे. ठाकरे नगरध्ये आले असता त्यांनी जिल्ह्याचा बिहार करणार का? असे वक्तव्य केले. या व्यक्तव्याबाबत खा. गांधी यांनी खेद व्यक्त केला. ठाकरे यांचा संभ्रम दूर करण्यासाठी नगर जिल्ह्याच्या वस्तुस्थितीविषयी पत्र लिहणार असल्याचे गांधींनी सांगितले.

नगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. मागील वर्षी 950 टँकर होते. आता केवळ 12 पाण्याचे टँकर सुरु आहेत. जिल्ह्याला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आहे. थोरात, विखे पाटील, काळे, कोल्हे, पिचड, गडाख, राजळे, निंबाळकर, नागवडे, पाचपुते यांची जिल्ह्याच्या विकासासाठी चांगले योगदान आहे. परंतु सध्या जो तो उठतो आणि जिल्ह्यावर टीका करतो.

केडगाव हत्याकांडाने नगर शहर व जिल्हा राज्यात बदनाम झाला आहे. ही घटना भूषणावह नाही. या घटनेतून सर्वजण चांगल्या विचाराने पुढे येवून जिल्ह्याचा विकास करु. काही व्यक्तीगत व समाजिक घटनामुळे जिल्हा बदनाम होत आहे. जिल्हाकडे वेगवेगळ्या क्षेत्रात ‘पॅटर्न’ म्हणून पाहिले जात असून सर्वच ठिकाणी जिल्ह्याचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा राज्यात सर्वोत्तम जिल्हा म्हणून ओळख आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाने मिळून केडगाव हत्याकांड घडवले असल्याचा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला होता. त्यावर गांधी म्हणाले की, या घटनेत भाजपाचा कुठलाही संबंध नाही. आ. कर्डिले स्वताहून पोलिसांसमोर हजर झाले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत, आरोपींची संख्या मोठी असल्याने वेळ लागेल. कायद्यापुढे सर्वसमान आहेत. पोलिस योग्य पद्धतीने तपास करतील.