होमपेज › Ahamadnagar › शिवसेना निवडणुका स्वबळावर लढणार

शिवसेना निवडणुका स्वबळावर लढणार

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 12:39AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

जून 2017 पर्यंतच्या शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करून सात-बारा कोरा करावा, ही शिवसेनेची मूळ मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली 34 हजार कोटींची कर्जमाफीही अद्याप मिळू शकली नाही. त्यामुळे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरीहिताचे सरकार आणण्यासाठी शिवसैनिकांनी झटून काम करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पद्मश्री विठ्ठलराव विखेपाटील सभागृहात आयोजित शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे  मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संपर्क प्रमुख दिलीप नाईक, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख डॉ. महेश क्षीरसागर, संजय गाडे, घनश्याम शेलार, सुहास वहाडणे, व्यापारी सेनेचे राम अग्रवाल, अशोक थोरे, नानासाहेब कवडे, सदा कराड उपस्थित होते. बाजार समितीच्यावतीने सभापती सचिन गुजर, उपसभापती मुक्‍ताजी फटांगरे, संचालक राधाकृष्ण आहेर, सचिव किशोर काळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी भुसे यांचा सत्कार केला.

भुसे म्हणाले, नगर हा साखर-सहकार सम्राटांचा जिल्हा आहे. ज्या पक्षाचे सरकार येईल, त्या पक्षात पर्यटन करण्याची येथील नेत्यांची सवय आहे. सत्ता गेल्यास ते पुन्हा पक्ष सोडतात. येथे शेतकर्‍यांची अवस्था मात्र वाईट आहे. 

शेतकरी संघटनेने संपूर्ण कर्जमाफीचे निवेदन दिले. हा पक्षाचा मूळ अजेंडा असून ठाकरे यांनी सरकारकडे सुरूवातीपासून सात-बारा कोरा करण्याचीच मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात 80 लाख शेतकर्‍यांची 34 हजार कोटी कर्जमाफी करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत सुमारे 25 लाख शेतकर्‍यांचे 15 हजार कोटींचे कर्जे माफ झाले. हा आकडा पुढे सरकण्याची शक्यता वाटत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.