Wed, Mar 20, 2019 13:06होमपेज › Ahamadnagar › मनपात शिवसेना-भाजप युती कायम!

मनपात शिवसेना-भाजप युती कायम!

Published On: May 05 2018 12:47AM | Last Updated: May 04 2018 11:24PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याबाबत किंवा सत्तेत कोणतेही पद न घेण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी सर्वांची एकत्रित बैठक होणे अपेक्षित आहे. तशी कुठलीही बैठक झालेली नाही. चर्चाही झालेली नाही. प्रदेशाध्यक्षांनीही आदेश दिलेले नसून मनपात आजही युती कायम असल्याचे माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले. तर सत्तेत पद न घेण्याचा हा निर्णय खासदारांचा वैयक्‍तिक निर्णय असावा, अशा शब्दांत गटनेते दत्तात्रय कावरे यांनी निशाणा साधला आहे.

स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पडून बाबासाहेब वाकळे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा काल (दि.4) करण्यात आली. त्यानंतर वाकळे यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, भाजप नेते आगरकर, सेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, गटनेते संजय शेंडगे, माजी शहर प्रमुख संभाजी कदम आदींसह नगरसेवक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी मावळत्या सभापती सुवर्णा जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर शिवसेना-भाजप नेत्यांनी एकत्रित पत्रकारांशी संवाद साधला.

आगरकर म्हणाले की, शिवसेना व खा. दिलीप गांधी यांच्यात वैयक्‍तिक स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. माझ्यावर आरोप झाल्यास मी प्रत्युत्तर देईल. सत्तेतून बाहेर पडण्याच्या व पद न घेण्याच्या निर्णयाबाबत त्यांना विचारले असता हा निर्णय झालाच नसून तसे सांगणारे खोटे बोलत आहेत. शिवसेना-भाजपात वरीष्ठ पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत असले स्थानिक पातळीवरील निर्णय स्थानिक परिस्थितीनुसारच घ्यावे लागतात. युतीबाबत नगरकरांचा कौल विचारात घेऊनच आजपर्यंत निर्णय झाले आहेत. त्यानुसारच मनपात एकत्रितपणे सत्ता स्थापन केली. आजही युती कायम असून वेगळी चूल मांडण्याचा प्रश्‍नच येत नाही. मात्र, भविष्यातील युतीबाबत आज काहीच सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसेना-भाजप विधानपरिषद निवडणुकीत एकत्र आले आहेत. वरीष्ठ पातळीवर युतीबाबत मागे-पुढे केले जाते. मग इथे का नाही? असा सवालही त्यांनी केला. नगरसेवकांवरील कारवाईबाबत केवळ वल्गना असून प्रदेशस्तरावर याबाबत चर्चा करु, असेही ते म्हणाले.

दत्ता कावरे म्हणाले की, छिंदमला उपमहापौर करतांना युती मान्य होती. मग आता दुसरा व्यक्‍ती पदावर बसत असेल तर खासदार गांधी यांना युतीचे वावडे का? असा सवाल करुन महापालिकेत पद घ्यायचे नाही हा त्यांचा वैयक्‍तिक निर्णय असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध लढलेले राठोड व आगरकर मागील काही वर्षांपासून एकत्र आले आहेत. महापालिकेतही एकत्र आले असल्याने खा. गांधी गट बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.