Thu, Jun 04, 2020 06:42होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : अखेर 'ती' सुखरूपपणे घरी परतली  

अहमदनगर : अखेर 'ती' सुखरूपपणे घरी परतली  

Last Updated: Mar 28 2020 4:10PM
राहुरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्याने राहुरी येथे दोन दिवस अडकलेल्या तरूणीला सखरूप पुण्यातील घरी पोहोचविण्याचे काम शिवबा प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगरसेवक आदिनाथ कराळे यांच्या शिवबा प्रतिष्ठानने माणुसकीला जपले आहे. प्रतिष्ठानने प्रशासनासह गरजूवंतांसाठी पुढाकार घेत समाजहिताला प्राधान्य देत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. 

कोंढापूरी (पुणे) येथून उपचारासाठी श्रीरामपूरला एक तरूणी आली होती. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पुण्याकडे निघालेली तरूणी राहुरी फॅक्टरी येथे अडकली. ती सलग दोन दिवस येथेच अडकून होती. संचारबंदी असल्याने कोणतेही वाहन रस्त्यावर नव्हते. तसेच ज्या गाड्या जात होत्या त्या तरूणीच्या थांबण्याच्या विनवणीस प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर घरी कशी जाऊ, निर्जन परिस्थितीत माझे काय होणार? या विवंचनेत सापडलेल्या तरूणीला रडू कोसळले. अखेर तिच्या रडण्याकडे शिवबा प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्‍यांचे लक्ष गेले. संबंधितांनी विचारपूस केल्याने समस्या लक्षात आली. तरूणी दोन दिवसांपासून उपाशी पोटी होती. नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी पुढाकार घेत तरूणीला धीर देत जेवणाची व्यवस्था केली. आम्ही शिवबाचे मावळे आहोत, तुम्हाला तुमच्या घरी सूखरूप पोहोचवू असे आश्‍वासन कराळे यांनी देताच तरूणीला धीर आला. शिवबा प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी तरूणीला पुणे येथे पोहोचवत मानवाच्या स्पर्षाने आजाराने मरण येते परंतु अजूनही माणुसकीने जग सर्व काही जिंकता येते हे दर्शविण्याचे कार्य केल्याची चर्चा होत आहे.

शिवबा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला सहकार्य करत कामात पुढाकार घेत आहेत. आजारी रूग्णांना घरपोहोच वैद्यकीय सेवा पुरविणे, औषधांचा पुरवठा करणे, रस्त्यावरील बेघर व असहाय्य लोकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे आदी कार्य शिवबा प्रतिष्ठानकडून राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात समाजहिताचे कार्य केले जात आहे.