Wed, Jul 24, 2019 07:52होमपेज › Ahamadnagar › ‘फ्रेंडशीपडे’ ला तनपुरे-गाडेंची राजकीय मैत्री

‘फ्रेंडशीपडे’ ला तनपुरे-गाडेंची राजकीय मैत्री

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMराहुरी : प्रतिनिधी 

‘फ्रेंडशीप डे’ चे औचित्य साधत एकत्र आलेल्या प्राजक्त तनपुरे व शिवाजी गाडे यांनी एकत्र असल्याचे सांगत एकीनेच तालुक्याचे गतवैभव प्राप्‍त करून देण्याचे आश्‍वासन वरवंडी येथील कार्यक्रमात दिले. तनपुरे यांनी विधानसभेबाबत पक्षाचा आदेश दोघांसाठी महत्त्वाचा राहणार असल्याचे सांगितले, तर गाडे यांनी आ. कर्डिले यांच्या निष्क्रियतेबाबत टीका साधत जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे आश्‍वासन दिले. 

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी तनपुरे व गाडे यांनी विधानसभेची चर्चा करून राजकीय वातावरण पेटवून दिले. एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे तनपुरे व गाडे जोडीने गेल्या काही निवडणुकांपासून एकी दाखवित यश संपादित केले. राष्ट्रवादी पक्षाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या तनपुरे व गाडे यांच्या जोडीबाबत तालुकाभरात वेगवेगळी चर्चा केली जात असतानाच नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेच्या चर्चेला हात घालत राष्ट्रवादीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत. विधानसभेची कोणतीही स्वार्थी भावना मनात न ठेवता मी किंवा माझ्या कुटुंबीयांकडून कामकाज केले जात नाही. विधानसभेसाठी पक्षाचा जो आदेश असेल त्या आदेशानुसारच शिवाजी गाडे व आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून राहुरी मतदार संघात बदल घडविणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. 

जि.प.सदस्य शिवाजी गाडे यांनी विरोधकांनी न केलेल्या कामाचे श्रेय न घेता तालुक्याची झालेली वाताहात पाहता विकासकामांकडे लक्ष द्यावे असे सांगत आ. कर्डिले यांचे नाव न घेता टोला लगावला. राहुरी भागाचा विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे गाडे यांनी आश्‍वासन दिले. याप्रसंगी सभापती मनीषाताई ओहोळ, उपसभापती बाळासाहेब लटके, सदस्य रवींद्र आढाव, गटविकास अधिकारी अनंत परदेशी, प्रकाश देठे, शरद ढगे, प्रदीप पवार, मनिषा ढगे, प्रणिता भालेराव, मंगल बर्डे, मंदाकिनी मिसाळ, श्रीकांत ढगे आदींची उपस्थित होते. प्रस्ताविक साईनाथ कदम यांनी तर सूत्रसंचालन तुकाराम तनपुरे यांनी केले.