Sun, Jul 21, 2019 01:25होमपेज › Ahamadnagar › छिंदमचा कोठडीतील मुक्काम वाढला!

छिंदमचा कोठडीतील मुक्काम वाढला!

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 10:04AMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह हिंदूंच्या अन्य सण-उत्सवांमुळे पोलिस प्रशासनावर कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. सामाजिक शांतता बाधित होऊ नये, यासाठी पोलिस कोठडीचा हक्क राखून ठेवत आरोपी श्रीपाद छिंदम याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी तोफखाना पोलिसांच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावल्याने, छिंदमचा नाशिक रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा महापालिकेचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात सामाजिक तेढ निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. छिंदमच्या वक्‍तव्यावरून नगरसह राज्यभर आंदोलने झाली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर छिंदमला अटक केल्यानंतर पोलिस कोठडीचा हक्क राखीव ठेवून, तोफखाना पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर येथील जिल्हा उपकारागृहात त्याला हलविल्यानंतर अन्य कैद्यांनी छिंदमविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. या पार्श्‍वभूमीवर त्याला येरवड्याला हलविण्याचे सांगत पोलिसांनी चकवा देत, नाशिकच्या कारागृहात त्याची रवानगी केली.  

त्याची न्यायालयीन कोठडीची मुदत काल (दि.1) संपत असल्याने, त्याला जिल्हा न्यायालयात आले जाईल, असे सर्वांना वाटत होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपी छिंदमला न्यायालयात हजर न करून पुन्हा एकदा चकवा दिला. 

अतिरिक्‍त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. बनकर यांच्यासमोर आरोपी छिंदमला हजर करण्याऐवजी तपासी अधिकारी तथा तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी पोलिस कोठडीचा हक्क राखीव ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याबाबत प्रस्ताव सादर केला. 

छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती तिथीनुसार रविवारी (दि.4) साजरी केली जाणार आहे. शिवसेनेसह काही संघटना तिथीनुसार जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करतात. या जयंती सोहळ्याच्या उत्सवासाठी पोलिस प्रशासनाला मोठा बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. त्यातच होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे सण आल्याने या कालावधीत कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांना आहे.

त्यामुळे या कालावधीत पोलिस कोठडी घेतली तरी, गुन्ह्याच्या तपासासाठी वेळ मिळणार नाही. आरोपी छिंदम याच्या आवाजाने नमुने घेणे, त्याने कोणत्या कारणाने सामाजिक गुन्हा केला, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस कोठडीचा हक्क आबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून छिंदमच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. क्रांती कुलकर्णी यांनी काम पाहिले.