Fri, Jul 19, 2019 07:26होमपेज › Ahamadnagar › सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत गर्दी

सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत गर्दी

Published On: Jan 01 2018 1:52AM | Last Updated: Dec 31 2017 10:32PM

बुकमार्क करा
शिर्डी : प्रतिनिधी

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्ष सुख-समृद्धीचे जाऊ दे, असा आशीर्वाद घेण्यासाठी काल देशभरातून साईभक्तांनी शिर्डीत मोठी गर्दी केली. मात्र, प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी केलेले व्यवस्थापन गैरसोयीचे ठरल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, काल 31 डिसेंबर रोजी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात आले होते. काल रविवार असल्याने प्रशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने शिर्डीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच काल सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि  आज सोमवार. नवीन वर्षाचा पहिला दिवस साईंच्या दर्शनापासून सुरू करण्याचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून आलेल्या साईभक्तांनी शिर्डीत गर्दी केली होती.

त्यामुळे वाहतूक बाहेरच्या मार्गाने वळविण्यात आली. परिणामी, शहरात भाविकांना मोकळा श्‍वास घेता आला आणि वाहतुकीची कोंडी झाली नाही. सकाळपासूनच साईबाबा संस्थान प्रशासनाने मंदिर परिसरात भाविकांना थांबण्यास मनाई केली होती. त्यामुळे साईबाबा म्युझियम, गुरुस्थान व शौचालय परिसर निर्मनुष्य करण्यात आल्याने साईभक्तांचे प्रचंड हाल झाले. यावेळी शौचालयाबद्दल संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना विचारले असता त्यांनी गेट नंबर एकजवळ मोबाईल शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगून गर्दीच्या काळात मंदिर परिसरात अशाप्रकारे नियोजन केले असल्याचे सांगितले. त्यामुळे दूरवरून आलेल्या  भक्तांमध्ये नाराजी पसरली. 

काल दिवसभरात लाखो साईभक्तांनी दर्शन घेतले. रात्री साईनगर येथील मैदानावर संगीत भजनाचा  कार्यक्रम पार पडला.  गर्दीचे  नियोजन करण्यासाठी अतिरिक्त 200 पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, सशुल्क दर्शन पासेस घेतलेल्या भाविकांना दर्शनासाठी 16 गुंठ्यात उभे करण्यात आले. त्यामुळे त्यांनाही मोठी कसरत करावी लागली.