होमपेज › Ahamadnagar › शिर्डीच्या साई संस्‍थानकडून पुरग्रस्‍तांना १० कोटीची मदत जाहीर 

शिर्डीच्या साई संस्‍थानकडून पुरग्रस्‍तांना १० कोटीची मदत जाहीर 

Published On: Aug 10 2019 2:57PM | Last Updated: Aug 10 2019 2:57PM




शिर्डी : पुढारी ऑनलाईन

गेल्‍या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा जिल्‍ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामध्ये आलेल्‍या महापुरामुळे कोल्‍हापूर सांगलीमध्ये अनेकांचे जीव गेले तर, हजारो संसार उद्ध्वस्‍त झाले. अशा परिस्‍थितीत पुरग्रस्‍तांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक संस्‍था पुढे येत आहेत. शिर्डीच्या साई संस्‍थाननेही पुरग्रस्‍तांसाठी मदतीचा हा पुढे केला असून, १० कोटीची मदत जाहीर केली आहे.

अनेक स्‍वयंसेवी संस्‍था, संघटना आणि ट्रस्‍टकडून मदत पुरवली जात असून, या पुरग्रस्‍तांना मानवतेच्या भावनेतून जीवनावश्यक वस्‍तूंसह त्‍यांचे संसार पुन्हा सावरण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्‍थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १० कोटीची मदत देण्याचे जाहीर केले आहे. याआधी काल शुक्रवारी मुंबईच्या सिध्दीविनायक ट्रस्‍टकडूनही पुरग्रस्‍तांसाठी पिण्याच्या स्‍वच्छ पाणी पुरवणार असल्‍याची घोषणा केली होती. या सोबतच मराठी चित्रपटसृष्‍टीतील अनेक कलाकारांनीही मदतीसाठी पाउल उचलले आहे. अनेक मराठी मालिकांमधील कलाकारांनी आपले एक दिवसांचे मानधन देणार असल्‍याचे सांगितले आहे.

पश्चिम महाराष्‍ट्रात अतिवृष्‍टीमुळे महापुराची भीषण परिस्‍थिती उद्‍भवली आहे. यामुळे कोल्‍हापूर, सांगली, सातारा जिल्‍हा महापुरात बुडाला. या जिल्‍ह्यांना लाल समुद्राचे स्‍वरूप आले आहे. हजारो कुटुंबे विस्‍थापित झाली आहेत. शेकडोंचे संसार उद्ध्वस्‍त झाले आहेत. या जिल्‍ह्‍यातील नागरिकांवर अचानक आलेल्‍या या अस्‍मानी संकटामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. डोक्‍यावर छप्पर नाही, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही ,घालायला कपडे नाहीत अशा परिस्‍थित लोकांना समाजातील अनेक लोकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.