Fri, Aug 23, 2019 21:56होमपेज › Ahamadnagar › साईबाबांमुळे शिर्डीचे महत्त्व कायम राहणार :राष्ट्रपती कोविंद

साईबाबांमुळे शिर्डीचे महत्त्व कायम राहणार :राष्ट्रपती कोविंद

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:09PMशिर्डी : प्रतिनिधी

साईबाबा हे महान विभूती होते. त्यांनीच त्यांच्या वास्तव्यासाठी शिर्डीची निवड केली होती. ते सुमारे 58 वर्षे शिर्डीत राहिले. त्यामुळे साईबाबांच्या जन्मस्थळाबाबतचा वाद निरर्थक आहे. शिर्डीतील माझ्या भाषणात मी केवळ काही लोकांचे म्हणणे सांगितले होते, असे सूतोवाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले, अशी माहिती भाजपाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी भ्रमणध्वनीवर दिली आहे.

साईसमाधी शताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रपतींनी साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी आहे आणि तेथेही विकास झाला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर तेव्हा बर्‍याच उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली शिर्डीतील भाजप-सेनेचे नेते, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना खा. लोखंडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

खा. लोखंडे यांनी शिर्डीचे लोकप्रतिनिधी म्हणून साईभक्तांच्या काय भावना आहेत, हे विषद केले. शिर्डीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कमलाकर कोते, भाजपचे शिर्डी शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि भाजप शहर उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनीही शिर्डीकर आणि साईभक्तांच्या भावना राष्ट्रपतींसमोर मांडल्या.

शिर्डीकरांनी राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात म्हटले की, यापूर्वी अनेकांनी साईबाबांचे जन्मस्थळ, जात किंवा आई-वडील कोण होते? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपण कोण आहोत हे साईबाबांनीच गोपनीय ठेवले आहे. त्यामुळे साईबाबांचा जन्म पाथरीला झाला आहे, असे ठामपणे म्हणणे साईबाबांवर अन्याय करणारे व कोट्यवधी भाविकांच्या भावना दुखावणारे ठरेल. पाथरीच्या साईमंदिराचा विकास होण्याबाबत कुणाचेच दुमत नाही, असा विकास झाला, तर आम्हाला आनंदच आहे. मात्रस बाबांचे जन्मस्थान म्हणून पाथरीची ओळख नको. यावेळी भभाजपचे ज्येष्ठ नेते गजानन शेर्वेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, शिवसेनेचे राहाता तालुका सहप्रमुख विजय जगताप आदी उपस्थित होते.