Tue, Nov 20, 2018 06:02होमपेज › Ahamadnagar › शिर्डीची विमानसेवा 24 तासांनंतर पूर्ववतb

शिर्डीची विमानसेवा 24 तासांनंतर पूर्ववत

Published On: May 23 2018 1:06AM | Last Updated: May 22 2018 11:20PMशिर्डी : प्रतिनिधी

शिर्डीत विमानसेवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर मंगळवारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या पथकाने विमानतळावर जाऊन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. दरम्यान, साईबाबा हवाई अड्ड्याची विमानसेवा पूर्ववत झाली असल्याची अधिकृत माहिती स्थानिक विमान प्रशासन अधिकार्‍यांनी दिली आहे.

सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुंबईवरून निघालेले विमान शिर्डी विमानतळावरील धावपट्टीवर उतरत असताना, तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरून घसरले होते. त्यामुळे विमान प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने या प्रवाशांना बसने टर्मिनलवर सोडण्यात आले होते. त्यामुळे कालची हैदराबाद विमानसेवा रद्द करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या पथकाने घटनास्थळी भेेट देवून पाहणी केली. याबाबतचा अहवाल विमान संचालनालयाकडे सादर करण्यात येणार आहे. सोमवारी धावपट्टीवर थांबलेले विमान हलविले. त्यानंतर मंगळवारी दुपारी हैदराबाद विमानाने उड्डाण घेतले, तर दुपारी 3.30 च्या सुमारास मुंबईकडे विमानाने प्रयाण केले. त्यामुळे पुन्हा एकदा साईबाबा हवाई अड्ड्यावरून विमान वाहतूक सेवा पूर्ववत झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. मुंबईवरून आलेल्या विमानात कोणत्या तांत्रिक अडचणीमुळे भाविकांना हा त्रास सहन करावा लागला, याचा अहवाल विमान संचालनालयाकडे सादर केला जाईल.