Wed, Apr 24, 2019 19:33होमपेज › Ahamadnagar › साईचरणी साडेसहा कोटींचे दान

साईचरणी साडेसहा कोटींचे दान

Published On: Jul 31 2018 1:28AM | Last Updated: Jul 31 2018 12:36AMशिर्डी : प्रतिनिधी

आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी आलेल्या साईभक्तांनी साईंच्या झोळीत चार दिवसांत तब्बल 6 कोटी 66 लाख रुपयांचं दान टाकलं आहे. गेल्या गुरूपौर्णिमा उत्सवाच्या दानाच्या तुलनेत सुमारे 1 कोटींचं दान यंदा वाढलं असून, साईंच्या दानातील हा एक विक्रम आहे. 

दि. 26 ते 29 जुलै दरम्यान शिर्डीत साई संस्थानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला गेला. या चार दिवसांत जगातील व देशातील सुमारे तीन लाख भाविकांनी साई चरणी नतमस्तक होत तब्बल 6 कोटी 66 लाख रुपयांचं दान दिलं आहे.  त्यामध्ये दक्षिणा पेटीत सुमारे 3 कोटी 83 लाख रुपयांचं तर देणगी काऊंटरवर 1 कोटी 57 लाखांचं दान दिलं आहे. डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे 42 लाख व ऑनलाईन देणगीवरून सुमारे 28 लाख रुपये आले आहे. तर मनीऑर्डरच्या माध्यमातून 3 लाख रूपये आले आहेत. तसेच 438 ग्रॅम सोन्याच्या माध्यमातून 11 लाख रुपये तर चांदीच्या माध्यमातून 2 लाख रुपयांचे दान आले आहे. त्याचप्रमाणे 14 देशांचे परकीय चलन ही दानात आले आहे.  असे मिळून 6 कोटी 66 लाखांच दान साईभक्तांनी साईंच्या झोळीत टाकलं आहे. 

गत गुरुपौर्णिमा उत्सवाच्या वेळेपेक्षा सुमारे 1 कोटींचं दान वाढले आहे. त्यामुळे साईंच्या झोळीत दानाचे जुने विक्रम मोडीत निघत आहे. या उत्सव काळात सुमारे सव्वा तीन लाख भाविकांनी साईंचे दर्शन घेतले असून, त्यापैकी 52 हजार भाविकांनी सशुल्क दर्शनाचा लाभ घेतला आहे. तसेच 3 लाख भाविकांनी मोफत बुंदी प्रसादाचा लाभ घेतला आहे. तर अडीच लाख रुपयांची लाडू पाकिटांची विक्री झाली. यामधून 66 लाख रुपये संस्थानला मिळाले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे आदी उपस्थित होते.