होमपेज › Ahamadnagar › शिर्डीत साईभक्तांचा जनसागर

शिर्डीत साईभक्तांचा जनसागर

Published On: Dec 25 2017 1:21AM | Last Updated: Dec 24 2017 11:08PM

बुकमार्क करा

शिर्डी : प्रतिनिधी

नाताळ सणाच्या दोन दिवस अगोदरच शनिवारी रात्री व रविवारी पहाटेपासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत महाराष्ट्रासह देशभरातून साईभक्तांचा जनसागर उसळला आहे. दरम्यान, भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी प्रशासनाची मोठी धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.

शनिवारपाठोपाठ साप्ताहिक सुट्टीचा रविवार आणि सोमवारी नाताळ सणाची सुट्टी आल्याने शिर्डीत भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.  संस्थान प्रशासनाने गर्दीचा अंदाज घेत स्थानिक पातळीवर भक्तांच्या मूलभूत सुविधांवर लक्षही केंद्रित केले होते. त्यासाठी दर्शनबारीचे प्रवेशद्वार क्रमांक 2 बंद करण्यात आले होते. जुन्या प्रसादालयाच्या जागेत मोफत दर्शन तिकिटाचे काऊंटर उघडण्यात आले होते. तसेच लक्ष्मी मार्गावर असणारे मोफत दर्शन तिकिटाचे काउंटरही सुरूच होते. या ठिकाणावरून त्यांना प्रवेशद्वार क्रमांक 2 चे दर्शन तिकीट मिळत होते. मात्र दोन नंबर गेट बंद असल्याने भाविकांची त्रेधातिरपीट उडाली होती. त्यामुळे मोफत पास व त्यानंतर दर्शन रांगेतही ताटकळत उभे राहावे लागत असल्याने  दर्शन मिळेल की नाही, अशी चिंता भाविक बोलून दाखवत होते. त्यामुळे मोफत दर्शन तिकिटावर दर्शन घेणे योग्य आहे का , असा सवाल उपस्थित केला आहे. 

दरम्यान, काल भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेत उपराष्ट्रपती  व्यंकय्या नायडू यांच्या दौर्‍यानंतर वाहतूक शाखेने रविवारीच सकाळी मंदिर परिसरात प्रवेशद्वार क्रमांक 1 हा विना वाहन ठिकाण म्हणून घोषित करून कारवाई सुरू केली. त्यामुळे शिर्डीत येणार्‍या भाविकांना रिंगरोडवरून जावे लागले. त्यामुळे भाविकांना या त्रासापासून सुटका मिळाली, तर प्रसादालयाकडे जाणार्‍या-येणार्‍या वाहनांसाठी प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. त्यामुळे भाविकांची गर्दी वाढतच होती. नाताळच्या सणामुळे भाविकांचा ओघ शिर्डीकडे वाढल्याने बर्‍याच वाहतुकीची कोंडी होत होती. ती दूर करताना वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती.