Tue, Apr 23, 2019 19:55होमपेज › Ahamadnagar › साईंच्या दरबारात ‘दुवा’ आहे ‘दवा’ नाही

साईंच्या दरबारात ‘दुवा’ आहे ‘दवा’ नाही

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 11:02PMशिर्डी : प्रतिनिधी 

साईबाबांची पुण्यभूमी म्हणून करोडो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून साईनगरीची ओळख जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचली आहे. शिर्डीत साईदर्शनासाठी आलेल्या भाविकांना उदीच्या माध्यमातून  ‘दुवा’ मिळत असली तरी संस्थानने कोट्यावधी रुपये खर्चुन उभारलेल्या साईनाथ व साईबाबा रूग्णालयात काही दिवसांपासून ‘दवा’ मिळत नसल्याचे उदासिन चित्र भाविकांना अनुभवायास मिळत आहे.
साईबाबा संस्थानवर आलेल्या विश्‍वस्त मंडळाने दर्शनबारीत भाविकांना उदी मिळावी, म्हणून यशस्वी नियोजन केले. भाविकांकडून ही उदी बाबांची संजीवनी असल्याची प्रांजळ कबुली दिली जात आहे. बाबांच्या दरबारातील ‘दुवा’ म्हणून भाविक या उदीचा आनंदाने लाभ घेत आहेत. एकीकडे भाविकांना बाबांची उदीच्या माध्यमातून दुवा मिळत असताना दुसरीकडे बाबांच्या सानिध्यात उभारलेल्या रुग्णांलयामध्ये औषधांचा मात्र वाणवा निर्माण झाली आहे.  

गेल्या पंधरा वर्षात साईबाबा रूग्णालयाचा राज्यात परराज्यात मोठा प्रसार झाला आहे. त्यामुळे शिर्डीत साईभक्त व रूग्ण म्हणून येणार्‍यांची संख्या कमी नाही. त्यात विश्‍वस्त मंडळाने साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्ताने अवघ्या 10 रुपयांच्या केस पेपरवर मोफत उपचार सुरू झाले. मात्र प्रशासन ह्या सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे.  वास्तविकता, त्या रूग्णालयात कार्य करणारे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहेत मात्र रूग्णांना या रूग्णालयात आवश्यक असणारी औषधे मिळत नाही, ही शोकांतिका शताब्दी वर्षात चिंतेचा विषय बनली आहे. संस्थानचे संबधित खरेदी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व परिसरातील संलग्न असलेले मेडिकल व्यावसायिकांचे लागेबांध आहेत काय ? असा सवाल करुन त्यामुळे महत्वाची व साधारण औषधी साईनाथ रूग्णालयात मिळत नसल्याची साशंकता व्यक्त केली जात आहे.

साध्या-साध्या औषधांची यादी येथील डॉक्टरांकडून रुग्णांच्या हातात दिली जाते व ते सांगतील त्या मेडिकल दुकानांमधून ही औषधे आणावी लागतात. त्यामुळे रुग्णांना संस्थानची रुग्णालये विनापयोगी ठरत आहेत. संस्थान प्रशासन रुग्णांची अत्यावश्यक सेवा म्हणून आवश्यक औषधांच्या खरेदीकडे का दुर्लक्ष करीत आहे ? असा सवाल भाविकांमधून उपस्थित केला जात आहे. यामधून औषधी खरेदी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. यातून औषधांच्या खरेदीबाबत काहीतरी मोठे गौडबंगाल झाले आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मात्र सध्यातरी भाविकांना बाबांच्या दरबारी दुवा मिळते, मात्र दवा मिळत नाही, हीच मात्र वास्तविकता आहे.