होमपेज › Ahamadnagar › शिर्डी, राहुरी, अकोलेला नवीन पोलिस निरीक्षक

शिर्डी, राहुरी, अकोलेला नवीन पोलिस निरीक्षक

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 06 2018 11:21PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शिर्डी, राहुरी व अकोले या पोलिस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी मिळाले आहेत. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल (दि. 6) रात्री उशिरा तीन पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा आदेश काढले आहेत.

पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांची जिल्ह्याबाहेर बदली झाल्यामुळे शिर्डीचे प्रभारी अधिकारी पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागेवर जिल्ह्यात नव्याने बदलून आलेले पोलिस निरीक्षक अरविंद माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माने हे मुंबई शहर येथून बदलून आले आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या राहुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे वाघ यांची राहुरी येथून अकोले पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अकोले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिळीमकर यांची राहुरी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. शिळीमकर हे गेल्यावर्षीपासून अकोले येथे नेमणुकीस होते. वाघ यांच्या बदलीमुळे रिक्त होणार्‍या जागेवर शिळीमकर यांची वर्णी लागली आहे. अधिकार्‍यांची नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे शर्मा यांनी आदेशात नमूद केले आहे.

राहुरी परिसरातील वाढती गुन्हेगारी, वाळूतस्करी, गावठी कट्टे, संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा जेरबंद घालण्याचे मोठे आव्हान शिळीमकर यांना पेलावे लागणार आहे. वाघ यांनी दोन वर्षांच्या राहुरी येथील कार्यकाळात चांगली कामगिरी केली आहे. शिर्डी परिसरात शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी पोलिस निरीक्षक माने यांचा प्रयत्न करावे लागणार आहेत. परराज्यातून येणार्‍या भक्तांची पाकिटमारी हा शिर्डी परिसरातील चिंतेचा विषय आहे. मुंबई शहर येथील आर्थिक गुन्हे शाखेतून बदलून आलेल्या माने यांना आता शिर्डीची धुरा सांभाळावी लागणार आहे.