Sun, Apr 21, 2019 05:49होमपेज › Ahamadnagar › शिर्डी-मुंबई विमानाचे टायर फुटले 

शिर्डी-मुंबई विमानाचे टायर फुटले 

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 21 2018 11:23PMशिर्डी : प्रतिनिधी

मुंबईहून निघालेले विमान शिर्डी विमानतळावरील धावपट्टीवर उतरत असताना, त्याचे टायर फुटल्याने विमान जागेवरच बसले. त्यामुळे विमान तळावरील कर्मचार्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. परंतु, विमानातील प्रवाशांना कुठलीही हानी पोहचली नाही. या गोंधळामुळे शिर्डी येथून हैद्राबादला जाणार्‍या विमान सेवाही रद्द केली. यामुळे मुंबई विमानाने आलेल्या व हैद्राबादला जाणार्‍या भक्तांच्या अडचणी वाढल्या होत्या. 
साईबाबा हवाई अड्ड्यावर सोमवारी सायंकाळी मुंबईवरून निघालेले विमान शिर्डी येथे धावपट्टीवर उतरत असताना अचानक त्या विमानाचा टायर फुटला. त्यामुळे ते विमान धावपट्टीवर थबकले. त्यामुळे विमानात असणार्‍या प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. विमानतळावरील कर्मचार्‍यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. 

या विमानाच्या लँडिंगनंतर काही वेळेत शिर्डी- हैदराबाद ही विमानसेवा टेकऑफ होणार होती. मात्र, मुंबईवरून आलेले विमान हे रनवेवर असल्याने त्या विमानास उड्डाण घेता आले नाही, अशी माहिती हैद्राबादला जाणार्‍या साईभक्ताने भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे. याबाबत विमान प्रशासनाच्या अधिकार्‍यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्या अधिकार्‍यांनी भ्रमणध्वनीचा कॉल उचलण्यास असमर्थता दाखविली. दरम्यान, या विमानाच्या टायरची दुरुस्ती न झाल्याने हैद्राबादला उड्डाण घेणारे विमान रद्द करण्यात आले. सुमारे 100 साईभक्तांना अचानकपणे लक्झरी बस, खासगी कारद्वारे हैद्राबादला रवाना करण्यात आले. त्यामुळे भाविकांनी विमान प्रशासनाच्या या गैरसोयीबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबाबत माजी केंद्रीय हवाई मंत्री प्रफुल्‍ल पटेल यांनी या विमानतळाचा कारभार हा महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडून काढून केंद्राकडे देण्याची मागणी केली होती.