Thu, Jun 20, 2019 00:39होमपेज › Ahamadnagar › शेवगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

शेवगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:29PM

बुकमार्क करा

शेवगावः प्रतिनिधी

शेवगाव शहरात चोरांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून, चोरट्यांच्या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. एकाच रात्री तीन ठिकाणी चोर्‍या होऊन 70 हजार रुपयाचा ऐवज चोरीस गेला आहे. आठ दिवसाच्या आत दुसर्‍यांदा हा प्रकार घडला. यामुळे शहरातील नागरीक भयभीत झाले आहेत. शेवगाव शहरात सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान तीन ठिकाणी  अज्ञात चोरटयांनी चोर्‍या करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा जवळपास 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तर त्यांनी केलेल्या मारहाणीत अंबादास जायभाय हा जखमी झाला आहे. गेवराई राज्यमार्गावर असणार्‍या ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे आपल्या मावसभाऊच्या शेतात शेतमजुरीसाठी पत्नी, मुले व मावशीसह राहात असलेले अंबादास जायभाय आणि त्यांची पत्नी रात्री घराबाहेर झोपले होते. पहाटे त्यांचा मुलगा रडू लागल्याने त्यांच्या पत्नीने घर उघडून त्याला पाणी दिले.

पुन्हा दरवाजा बंद करीत असताना समोर चार ते पाच चोरटे दिसले. म्हणून त्या मोठ्याने ओरडल्या, त्यांच्या आवाजाने अंबादास जागे झाले. यावेळी चोरट्यांनी त्यांना काठ्याने मारहाण करून जखमी केले. चाकू, कोयत्याचा धाक दाखवून पत्नी शारदा हिच्या अंगावरील सोन्याचे दागिने घरातील रोख रक्कम, मोबाईल असा 39 हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला. याच रात्री पैठण राज्यामार्गावर क्रीडा संकुल शेजारी राहत असलेल्या अमोल सुभाष जाधव यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 10 हजार रुपयाचा ऐवज तर संभाजी बापुराव दळवी यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 18 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शेवगाव पोलीसांनी चार अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  हे सात ते आठ  हिंदी व अडखळत मराठी भाषा बोलत असल्याची माहिती आहे. आठवडाभरातील चोरीची ही दुसरी घटना असून, चोर्‍यांचा तपास लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.