होमपेज › Ahamadnagar › शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे राजकारण गारठले

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे राजकारण गारठले

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 10:50PM

बुकमार्क करा
.  शेवगाव : रमेश चौधरी

   शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे राजकारण गारठले गेले आहे. भाऊ, काका शांत आहेत तर ताईंचे दुःखाचे अश्रूू वाहत आहेत. कार्यकर्त्यांचा हुरुप कमी झाला असून, काहींनी राजकारणास रामराम ठोकला आहे. शासनाच्या अनेक योजनेपासून सर्वसामान्य नागरिक बाजूला पडले आहेत. त्यांच्या अडीअडचणीला कोणीच वाली नसल्यागत झाले आहे.

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची सध्या वाईट अवस्था झाली आहे. तीन साखर सम्राटांच्या अस्तित्वासाठी एकेकाळी राजकीय वातावरण ढवळून निघालेल्या या मतदारसंघात सध्या पक्षीय पातळीवर सुनसान शांतता आहे. पक्षनेतृत्व दिसेनासे झाल्याने गटागटांत विभागलेल्या कार्यकर्त्यात गोंधळाची स्थिती आहे. सध्यातरी माझ्यावरच पक्षाची धुरा आहे, असा आव आणणारे काही ठोकळ कार्यकर्ते सोडले तर कोण कोणत्या पक्षाचा आहे याचे मोठे कोडे होऊन बसले आहे. नव्याने तयार होणार्‍या  हौसी कार्यकर्त्यांना याचा ताळमेळ लागता लागत नाही. स्थानिक निवडणुकीत यामुळे पक्ष अथवा नेतृत्व बाजूला सारून गटतट वाढले जात आहेत. कुठलेही आंदोलन असले की तेच त्या आंदोलकांचा सहभाग  पाहून नागरिक आश्‍चर्यचकीत होतात.  कोण भाजपाचा, कोण राष्ट्रवादीचा याचा विचार करत बसतात.

शेवगाव तालुक्याचे अनेक महत्वाचे विषय ऐरणीवर असताना एरवी किरकोळ कागदांसाठी आदळआपट करणार्‍या दोन्ही पक्षात मरगळ तयार झाली आहे.  बोंडअळी, आणेवारी, रस्ते, वीज, पाणी आदींसह स्थानिक प्रश्ण, वैयक्तीक अडचणी अशा सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्याचा फारसा प्रयत्न केला जात नाही. हा अनुभव अनेक दिवसापांसून चालू असल्याने आता नागरिकही सक्षम होऊन पुढार्‍यांना विसरत चालले आहेत. कार्यकर्ते एकमेकांवर चिलखलफेक करण्यात दंग आहेत.

तालुक्याच्या राजकीय पटलावर आपले अस्तित्व ठेऊन असलेल्या राष्ट्रवादी व भाजपा अशा दोन्ही पक्षाच्या धुरिणांचे लक्ष सद्यस्थितीत कमी झालेले दिसत आहे. पक्षाचे प्रमुख शिलेदार सोडता कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवण्यात त्यांना फारसे स्वारस्थ असल्याचे जाणवत नाही. गेल्या अडीच ते तीन वर्षात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा जनसंपर्क कमालीचा कमी झाला आहे. निवडणूक प्रचारात आपला तालुका म्हणून अभिमान सांगणार्‍या घुले बंधूंची विधानसभेनंतर ही आपुलकी कमी झाल्यागत दिसत आहे. तालुक्याची सर्व सत्तास्थाने ताब्यात असताना केवळ आमदारकी अभावी आलेली मरगळ कार्यकर्त्यांना खटकणारी ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले व पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्याकडे तालुक्याची धुरा सोपवून घुले बंधू अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते कधीमधी निवेदन देण्याच्या बहाण्याने पक्ष जिवंत ठेवित आहेत.

राष्ट्रवादीला तारण्यासाठी भाजपातून आलेले केदारेश्‍वरचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांना आता आपल्याला कोण तारणार यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना हीच चिंता सतावत आहे. सध्या घुले व ढाकणे कार्यकर्त्यात ‘तुझे माझे जमेना’ असे चित्र आहे. राष्ट्रवादीत आल्यावर त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत याचा प्रत्यय त्यांच्या कार्यकर्त्यांना खटकला आहे.अडीच वर्षाची वाट पाहता पाहता लोकसभा निवडणुका येणार आहेत. यातच विधानसभा झाल्या तर काय हाही प्रश्‍न सतावणारा आहे. शेवगाव तालुक्यात त्यांचा केदारेश्‍वर कारखाना आहे मात्र तालुक्यात जनसंपर्क कमी आहे. काही नवीन राजकीय डावपेच ढाकणे आखत आहेत की काय असे तर्कवितर्क काढले जात आहेत.

माजी आमदार राजीव राजळे यांच्या निधनाने  कार्यकर्त्यांत आजही कमालीची अस्वस्थता आहे. समोर बसून अनेक अडचणीचे बसल्या बसल्या निराकरण झाले, आता काय? असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. हे नेतृत्व हरपले मात्र आ.मोनिका राजळे यांच्या माध्यमातून नेतृत्वाची आस लागली असताना अद्याप त्या दुःखातून बाहेर पडल्या नाहीत. त्यांच्या दुःखाची तीव्रता सर्वांना ज्ञात आहे पंरतु त्याला सावरून कुंटूबासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी त्यांनी पुढचे पाऊल उचलावे अशाच अपेक्षा व्यक्त होत आहेत. 

सध्या भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले असून केंद्रात, राज्यात आणि मतदार संघात भाजपाची सत्ता असताना विकासकामांचा प्रभाव कमी आहे. जनतेच्या मुलभूत प्रश्‍नांचा उपाय अद्याप भाजपाला सापडलेला नाही.  त्यांच्या अपेक्षा जैसे थे आहेत. गटातटात विभागलेले कार्यकर्ते एकमेकांच्या तंगड्या ओढीत असल्याचे पाहून जनतेला ‘याचसाठी केला होता का अट्टहास’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हे चित्र भविष्यासाठी निराशाजनक आहे.

 एकंदर येथील राजकारण गारठत गारठत आता ते पूर्ण गारठले गेले आहे. भाऊ, काका शांत असून ताई दुःखाचे अश्रू वाहत आहे. याने नागरीकांचे काय असा प्रश्‍न निर्माण झाला असून आता निवडणूक आल्यावर पाहू असा रोष तयार होत आहे.