Fri, May 24, 2019 20:41होमपेज › Ahamadnagar › पतीच्या निधनानंतरही ‘ तिचे’ सौभाग्य शाबूत !

पतीच्या निधनानंतरही ‘ तिचे’ सौभाग्य शाबूत !

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:18AMसंगमनेर : प्रतिनिधी

वयोवृद्ध पतीच्या निधनानंतर त्यांच्या विधवा झालेल्या सत्तर वर्षीय वृद्ध पत्नीचे कुंकू, मंगळसूत्र आणि बांगड्याचे सौभाग्य समजले जाणारी सर्व मंगल चिन्हे तशीच कायम ठेवत शेळके परिवाराने अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम केले.

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमालाचे सरपंच व महाराष्ट्र दारूबंदी आंदोलनाचे  सदस्य वकील मिनानाथ शेळके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक संदीप शेळके तसेच लोकपंचायतचे अमोल शेळके यांचे आजोबा खंडू भानू शेळके यांचे वयाच्या 90 व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या परिवाराने स्व. खडूं शेळके यांच्या विधवा झालेल्या पत्नी सत्यभामा शेळके यांच्या कपाळाचे कुंकू न पुसता, बांगड्या न फोडता तसेच मंगळसूत्रही न काढता त्यांची सर्व मंगल चिन्हे आठवणींच्या रुपाने कायम ठेवण्याचा निश्‍चय केला आणि तो सत्यातही उतरविला.

दरम्यान, मयत व्यक्तीची रक्षा नदीत सोडल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे खडूं शेळके यांची  मुले रावसाहेब, आनंदा, बापुसाहेब, बाळासाहेब व ज्ञानेश्वर शेळके तसेच  वकील मिनानाथ शेळके,  रतन कासार या सर्वांनी त्यांची रक्षा नदीत न सोडता अंत्यविधीच्या दुसर्‍याच दिवशी आपल्या स्वतःच्या  शेतात खड्डा घेऊन त्यात टाकली. तसेच त्याच ठिकाणी सर्व कुटूंबियांच्या हस्ते चिकूचे झाड लावत त्याची जोपासना करण्याची प्रतिज्ञाही केली.  

खरंतर, पतीच्या निधनानंतर विधवा पत्नीचे कुंकू पुसले जाते, बांगड्या फोडल्या जातात तसेच मंगळसूत्रही काढण्याची प्रथा पाहण्यात आहे. मात्र कालच्या शेळके कुटुंबाने या अंधश्रद्धेच्या प्रथेलाच अग्नीडाव देवून सकारात्मक विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न केला आहे.