Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Ahamadnagar › स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तिने सोडले घर!

स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तिने सोडले घर!

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 21 2018 10:26PMश्रीगोंदा : अमोल गव्हाणे

सैराट चित्रपट येऊन जवळपास दोन वर्ष होत आली मात्र तरीही त्याचा फिवर उत्तरायला तयार नाही. प्रेम प्रकरणातून अनेक मुलामुलींनी घर सोडले आहे. पण तालुक्यातील एका वीस वर्षीय तरुणीने घर सोडले ते वेगळ्याच कारणाने. जन्माला आलो आहोत तर स्वतःच वेगळे अस्तित्व दाखवायला हवे, या निर्धाराने तिने घर सोडत शिक्षणाची दारे पुन्हा एकदा उघडली आहेत. 

तालुक्यातील एक 20 वर्षाची तरुणी उपवर झाल्याने घरच्या मंडळीनी तिचा विवाह परराज्यातील एका तरुणाशी लावून दिला. अर्थात घरच्या मंडळीच्या आग्रह असल्याने तिला तो मोडता आला नाही. पण मुळातच तिचा स्वभाव वेगळा काही तरी करून दाखविण्याचा असल्याने ती संसारात जास्त दिवस रमली नाही. तिने सासर सोडून माहेर गाठले आणि इथे येऊन संगणकाचे शिक्षण घेऊ लागली. श्रीगोंद्यात तिला नोकरी न मिळाल्याने आणि सासरी जायचे नसल्याने तिने घर सोडले. याबाबत तिने कुणाला कसली माहिती दिली नव्हती. त्यामुळे घरची मंडळी ही अस्वस्थ होती. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घर सोडून जाताना तिने कपडे वगळता इतर कुठलेच साहित्य सोबत नेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनाही तपासाची दिशा सापडत नव्हती.ज्यावेळी तिचा शोध लागला त्यावेळी नेमका प्रकार समोर आला. 

माझे शिकून खूप मोठे होण्याचे स्वप्न आहे. स्वतःच्या पायावर शिक्षण घेऊन नोकरी मिळवायची आणि स्वतःचे वेगळ अस्तित्व मला दाखवायचे आहे, असे तिनं पोलिसांना सांगितले. पुण्यातल्या एका होस्टेलवर ती राहत असून एका खासगी कंपनीत अर्धवेळ नोकरी करून शिक्षण घेण्याचा तिने निर्धार केला आहे. पोलिसांनी तशा पद्धतीचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिस पथकाने तिला भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन तिचा निरोप घेतला.

याबाबत बोलताना सहायक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे म्हणाले, ज्यावेळी मिसिंग केस दाखल झाली त्यावेळी इतर प्रकारासारखाच हा प्रकार असावा, असे आम्हाला वाटले. मात्र, तपासात वेगळीच बाब समोर आली. त्यामुळे आमच्या सगळ्या तपास यंत्रणेलाही विशेष वाटले.