Mon, Aug 19, 2019 13:41होमपेज › Ahamadnagar › शरद पवारांकडून विखेविरोधकांना ‘हवा’

शरद पवारांकडून विखेविरोधकांना ‘हवा’

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 11:47PM-विष्णू वाघ

‘दूधाने तोंड पोळले, तर ताकही फुंकून पितात’ ही म्हण समाजमनावर अधोरेखित झाली आहे. या उक्‍तीप्रमाणे लोक वागतातही. परंतु जे याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना वारंवार चटका बसणार हे निश्‍चित. अशीच काहीशी अवस्था राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांची झाली असल्याचे चित्र दिसते आहे. नुकताच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सात्रळ येथे झालेल्या कॉ. पी. बी. कडू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू यांना उमेदवारी देणेबाबतचे सूतोवाच केले. त्यांच्या या वक्‍तव्यामुळे सध्या दोन्ही काँग्रेसमध्ये आलबेल परिस्थिती असल्याचा फुगा फुटला आहे. एवढेच काय काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात येऊन शरद पवारांकडून विखे विरोधकांना हवा दिली जात असल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचाविणारी ठरली आहे.

राज्यात सध्या भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे. गेली साडेतीन वर्षांपासून विरोधी बाकावर बसलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅकफूटवर गेलेले नेते सध्या प्रखर विरोध करतानाचे चित्र तयार होत आहे. त्यामध्ये नोटबंदी, जीएसटी, शेतकर्‍यांची कर्जमाफी व शेतीमालाच्या हमीभावासह विविध मुद्यांवर त्यांनी सांघिकपणे विरोधही केला. नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आघाडीचे ‘हल्लाबोल’ आंदोलन सत्ताधार्‍यांना घाम फोडणारे ठरले. त्यामुळे उद्या राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रामाणिकपणे आघाडी करून पुन्हा सत्ता काबीज करतील. याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.

आघाडीतील नेते आपासातील अंतर्गत मतभेद बाजूला सारून राजकीय कुरघोड्या थांबवतील, अशी समर्थकांमध्ये चर्चा होती. परंतु शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याला मित्राने (राष्ट्रवादी काँग्रेसने) पाडले असल्याचा आरोप केला. तर थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ. पी. बी. कडू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात जिल्ह्याची जबाबदारी पेलणारे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी नगर दक्षिणेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून अरुण कडू यांना प्रोजेक्ट केले. त्यामुळे या दोन्ही घटनांमधून आघाडी मधील बिघाडी अद्यापि मिटली नसल्याचे चित्र आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघातून युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी बरीच तयारी केली आहे. त्यांचा पक्ष कोणता? हा विषय अद्यापि गुलदस्त्यात असला तरी, जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणण्याची क्षमता विखे पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे लोकसभेला दोन्ही जागा काँग्रेसकडे देऊन त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जालना किंवा अन्य ठिकाणी जागेची अदला बदल घडेल. दोन्ही काँग्रेस सत्ता गेल्यामुळे चांगलेच पोळली आहे. यावेळी दोन्हींकडून एक-एक पाऊल मागे जाऊन निवडणुकीची रणनीती आखली जाईल, असा राजकीय निरीक्षकांचा व्होरा होता. दोन्ही काँग्रेसमधील बडे नेते अनुभवी असून त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, तर राज्यातील सत्ता पुन्हा काबीज करणे त्यांना फारसे अवघड जाणार नाही, असे बोलले जात होते. परंतु जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने दक्षिण लोकसभेसाठी कट्टर विखे विरोधकांचे नाव पुढे करून मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.

राज्यात पवार-विखे कुटुंबातील राजकीय संघर्ष जनतेला नवा नाही. यापूर्वी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील व माजी खा. यशवंतराव गडाख खटला गाजला आहे. तेव्हापासून शरद पवार व बाळासाहेब विखे यांच्यातील राजकीय संघर्ष पुढच्या पिढीत कायम राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालिन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात मुळा-प्रवरा विद्युत सहकारी संस्थेच्या माध्यमातून मोठा संघर्ष झाला. त्यामध्ये पवारांनी मुळा-प्रवरा बरखास्त करण्यात यश मिळविले. तर विखे यांनी पवारांच्या ताब्यातील बाजार समित्या बरखास्त करून परतफेड केली. ना. विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी सध्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे कट्टर विरोधक अरुण कडू यांचा पत्ता पुढे केल्याने हा राजकीय संघर्ष पुन्हा पेटणार काय? याबाबत बोलले जात आहे. जिल्ह्यात सध्या लोकसभेच्या दोन्ही जागा युतीकडे असल्यामुळे आघाडीसाठी पुढील निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. 

पवारांचा हा ‘गेम प्लॅन’ ?

यापूर्वी विखे विरोधक म्हणून जिल्ह्यात माजी आ. चंद्रभान घोगरे, श्रीरामपूर दूध संघाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, डॉ. राजेंद्र पिपाडा यांना मोठी ताकद मिळाली. हीच ताकद पुन्हा एकवटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही जुनी खेळी केली की, ना. विखे यांच्यावरील दबाव वाढविण्यासाठी पवारांनी अरुण कडू यांना पुढे करून हा गेम प्‍लॅन केला? याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.