Sat, Mar 23, 2019 18:28होमपेज › Ahamadnagar › शनिशिंगणापूर देवस्थान जाणार सरकारच्या ताब्यात 

शनिशिंगणापूर देवस्थान जाणार सरकारच्या ताब्यात 

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMसोनई : वार्ताहर

शनिशिंगणापूर देवस्थान हे शिर्डी व कोल्हापूरच्या धर्तीवरती सरकार ताब्यात घेणार असून अध्यक्ष व विश्वस्तांची निवड सरकार करणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सांगितले की, शिंगणापूर देवस्थान हे सरकारच्या ताब्यात घेण्याचे विचाराधीन असून त्याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे. 

शिंगणापूर देवस्थान सरकारने ताब्यात घेतल्यानंतर कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व विश्वस्तांची निवड सरकारकडून होणार आहे. त्यासाठी सरकार देवस्थानची घटना बदलू शकते. 1963 सालच्या देवस्थानच्या घटनेनुसार शिंगणापूरची  मूळ रहिवासी व्यक्‍तीच विश्वस्त होऊ शकते. परंतु नवीन नियमानुसार राज्यातील कुणीही शिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त होऊ शकतो. 

शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त होण्यासाठी शनिशिंगणापूर गावातील सुमारे 104 ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज केले होते. मुलाखती होऊन 11 ग्रामस्थांना विश्वस्त होण्याची संधी मिळाली. 1963 सालापासूनची शिंगणापूरची परंपरा या निर्णयाने धोक्यात येईल.सरकारने असा निर्णय घेतल्यास गावातून विरोध होण्याची शक्यता आहे.

शनिशिंगणापूरमध्ये राजकीय संघर्ष अत्यंत टोकाचा असला तरी या निर्णयाविरोधात ग्रामस्थ एकत्र येण्याची चिन्हे आहेत. कारण गावातीलच व्यक्तीला विश्वस्त होता येते, अशी देवस्थानची घटना आहे. सरकारला देवस्थान ताब्यात घेण्याअगोदर विधी व न्याय खात्याकडून देवस्थानची घटना बदलून कॅबिनेटमध्ये मंजुरी घ्यावी लागणार आहे.

या निर्णयाची कल्पना नाही : विश्वस्त शेटे 

देवस्थान शनिभक्तांच्या सुविधेसाठी कटीबद्ध आहे. विविध सामाजिक उपक्रम देवस्थानने हाती घेतले आहेत. सरकारच्या या निर्णयाची आम्हाला काही कल्पना नाही. परंतु सरकारने गावाच्या परंपरेचा विचार करावा, अशी अपेक्षा विश्‍वस्त अप्पासाहेब शेटे यांनी व्यक्‍त केली.