Thu, Apr 25, 2019 23:34होमपेज › Ahamadnagar › ‘शनैश्‍वर’चे अध्यक्षपद भूमाता ब्रिगेडला द्या : देसाई

‘शनैश्‍वर’चे अध्यक्षपद भूमाता ब्रिगेडला द्या : देसाई

Published On: Sep 04 2018 11:37PM | Last Updated: Sep 05 2018 2:06AMसोनई/ शनिशिंगणापूर : वार्ताहर

शनिशिंगणापूर देवस्थान सरकारने तत्काळ ताब्यात घ्यावे. तसेच मुख्यमंत्र्यांनी भूमाता संघटनेला अध्यक्षपद देऊन महिलेला अध्यक्ष करण्याची परंपरा सुरू ठेवावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती भूमाता रणरागिणी बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना दिली. तसेच राजकीय व्यक्तींची देवस्थानवर नियुक्ती केल्यास आंदोलनाचा इशाराही देसाई यांनी दिला आहे. 

देसाई यांनी आपल्या सहकार्‍यांसवमेत मंगळवारी (दि.4) दुपारी 2 वाजता शनिशिंगणापुरात येऊन शनी देवाचे चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले. मंदिर परिसरात माध्यमांशी बोलतांना देसाई म्हणाल्या, संपूर्ण राज्यातील मंदिरांत दर्शनासाठी समानता असावी, याकरिता मोठे आंदोलन केले होते. त्याची सुरुवात शनिशिंगणापूरपासून केली होती. आमच्या आंदोलनामुळे देशातील महिलांना शनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्याचा हक्क मिळाला. तसेच राज्यातील अनेक मंदिरांतील विविध प्रश्‍नांसाठी आमची संघटना लढत आहे. मंदिरात महिला पुजारी नेमावेत, दर्शन व्यवस्थेत समानता यावी, यासाठी आमचा लढा सुरू आहे. 

शनिशिंगणापूर देवस्थान सरकारने ताब्यात घेऊन सुमारे 2 महिने झाले आहेत. मात्र अद्यापही जुनेच विश्‍वस्त मंडळ काम पाहात आहे. सध्याचे अध्यक्ष व विश्‍वस्त मंडळ यांना कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मग सरकार नवीन विश्‍वस्त मंडळ का निवडत नाही. नवीन विश्‍वस्त मंडळ निवडताना सरकारने सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींना येथे स्थान द्यावे. राजकीय लोकांना विश्‍वस्त मंडळात स्थान दिल्यास आमच्या संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.