Thu, Jun 27, 2019 09:39होमपेज › Ahamadnagar › शनी शिंगणापूर देवस्थान; सरकारच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

शनी शिंगणापूर देवस्थान; सरकारच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

Published On: Jun 21 2018 1:29AM | Last Updated: Jun 20 2018 11:38PMसोनई : वार्ताहर

श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थान विश्‍वस्त मंडळाच्या कारभारावर आता राज्य सरकारचे नियंत्रण राहणार आहे. देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक व कार्यक्षम करण्यासह भक्‍तांसाठी उत्तम सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय काल (दि.20) मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे वृत्त काल दुपारी शनी शिंगणापूर येथे समजताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्‍त झाल्या.

शनैश्‍वर देवस्थानची 18 जुलै 1963 साली धर्मदाय आयुक्‍तांकडे न्यास नोंदणी झालेली असून, गेल्या 55 वर्षांपासून शनी शिंगणापूर येथे कायमचे वास्तव्य असणार्‍या स्थानिकांचे विश्‍वस्त मंडळ कार्यरत आहे. 6 जानेवारी 2016 या दिवशी धर्मदाय आयुक्‍तांनी 11 जणांचे विश्‍वस्त मंडळ जाहीर केलेले होते. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे आणि आजपर्यंत हेच विश्‍वस्त मंडळ कारभार करीत आहे. या विश्‍वस्त मंडळाविरूद्ध काही लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या, काही आरोप केले जात होते. परंतु, दैनंदिन व विकासकामे मात्र चालूच होती.

शनीदेवाच्या दर्शनासाठी दररोज 30 हजारांहून अधिक भाविक येत असतात. तर शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी देशभरातून एक लाखाच्या दरम्यान भाविक येतात. तर शनीआमावस्येला 3 ते 5 लाख भाविक हजेरी लावतात. भाविक वाढल्याने देवस्थानचे दैनंदीन उत्पन्न वाढत गेले. देवस्थानने स्वमालकीचे वाहनतळ, व्यापारी संकुल बांधले असून, दरवर्षी ते 11 महिन्यांच्या कराराने भाड्याने देण्यात येते.

तसेच शनी स्वयंभू मूर्तीवर वाहण्यात येणार्‍या तेलाचेही 11 महिन्यांच्या पद्धतीने टेंडर काढले जाते. यातून कोट्यवधीचे उत्पन्न देवस्थानला मिळते. सर्वसाधारणपणे दरवर्षी येथे 20 ते 22 कोटी रूपयांची उलाढाल होते. भाविकांच्या सुविधासाठी शनैशवर देवस्थानने 60 लाखंचे ग्रामीण रूग्णालय, गोशाळा, माध्यम्मिका विद्यालय, वसतिगृह, प्रसादालय, भोजन कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथे दोन एकर जागेत सांस्कृतिक भवन, भक्‍तनिवास, मंगल कार्यालय इत्यादीवर शनैश्‍वर देवस्थानने 5 कोटी रूपयांची भव्य वास्तू उभारली आहे.

या पार्श्‍वभूमीवर शनैश्‍वर देवस्थान विश्‍वस्त मंडळावर आपली वर्णी लागण्यासाठी स्थानिक रहिवाशी इच्छुक असतात. सन 2015 मध्ये धर्मदाय आयुक्‍तांकडे 104 स्त्री-पुरूषांनी अर्ज केले होते. नगर धर्मदाय कार्यालयात त्यांच्या मुलाखती घेण्यात येऊन 6 जानेवारी 2016 ला अकरा जणांचे नवीन विश्‍वस्त मंडळ नियुक्‍त करण्यात आले होते. मात्र, काल राज्य  मत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे शनैश्‍वर देवस्थान सरकारी अधिपत्याखाली येणार असून, कोल्हापूर अंबाबाई व शिर्डी साईबाबा देवस्थानच्या धर्तीवर शिंगणापूर शनैश्‍वर देवस्थानवर सुद्धा शासननियुक्‍त विश्‍वस्त मंडळ येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

राज्य सरकारच्या निर्णयाबाबत शिंगणापूर परिसरात चर्चा झाली. मात्र, त्यावर कोणी ठाम प्रतिक्रिया अगर निर्णय जाहीर केलेला नाही. बाहेरचे विश्‍वस्त येथे येतील व आपण जपलेल्या देवस्थानावर अधिकार गाजवतील, हे योग्य नसल्याची भावना एका माजी विश्‍वस्ताने खासगीत बोलताना व्यक्‍त केली. दरम्यान, नेवासा तालुका भाजपा अध्यक्ष माऊली पेचे, जिल्हा सरचिटणीस सचिन देसरडा, सुनील वाघ, बाळासाहेब बोरूडे, बाळासाहेब कुर्‍हाट, सयाजी शेटे, दादा घायाळ, सयाराम बानकर, दत्तात्रय शेटे या स्थानिक कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाचे स्वागत केले असून, शनीदेवाला अभिषेक करीत, फटाके फोेडून पेढे भरवित भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्‍त करण्यात आला आहे. मात्र, सत्ताधारी विश्‍वस्त मंडाळाकडून सर्व व्यवहार, भाविक दर्शन ‘जैसे थे’ सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

भाविकांची लुटमार थांबावी : शनिभक्‍त

आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शनीदर्शनासाठी येत असतो. परराज्यातून आलेल्या वाहनांचे नंबर बघून शिंगणापूरचे कमिशन एजंट परप्रांतीय वाहने थांबवून खासगी पूजा साहित्य दुकानात नेण्याच्या प्रयत्न करतात व मनमानी पद्धतीने पैसे घेतात. ही एक प्रकारे लुटमारच आहे. शिंगणापूरात स्वतंत्र पोलिस ठाणे आहे. देवस्थानचे सुरक्षा कर्मचारी फक्‍त गणवेश घालून उभे राहातात. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु, भाविकांना त्रास व मनमानी पैसे घेणारांवर कारवाई होत नाही. देवस्थानवर कुणीही येवो, मात्र भक्‍तांची लुटमारी थांबवी, अशी अपेक्षा एका शनी भक्‍ताने व्यक्‍त केली.

आमचा पारदर्शी कारभार 

आमचे विश्‍वस्त मंडळ स्वच्छ व पारदर्शी कारभार करीत असून, भाविकांना सोईसुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पानसनाला सुशोभिकरणाचा भव्य प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. शनीदेवाची आराधाना, पूजा करीत रूढी पंरपरा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अद्याप देवस्थानकडे काही लेखी आलेले नाही. देवस्थानचा कारभार नेहमीप्रमाणे सुरू असून भाविकांवर याचा काहीही परीणाम झालेला नाही.  - योगेश बानकर, कोषाध्यक्ष, शनैश्‍वर देवस्थान