Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Ahamadnagar › पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप

पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 03 2018 11:39PMनाशिक / नगर : प्रतिनिधी

खंडणीसाठी दोघांचे अपहरण आणि अनैसर्गिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी शिर्डी येथील कुख्यात पाप्या शेख आणि त्याच्या टोळीतील बारा गुन्हेगारांना मोक्का कायद्यान्वये आजन्म कारावासाची शिक्षा आणि एक कोटी 34 लाख रुपयांचा दंड येथील विशेष न्यायाधीश (मोक्का) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरेंद्र आर. शर्मा यांनी ठोठावला.

शिर्डी येथे 14 जून 2011 रोजी पाप्या ऊर्फ सलीम ख्वाजा शेख (32) याच्यासह इतर आरोपींनी प्रवीण विलास गोंदकर आणि रचित सुरेश पटणी या दोघांचे अपहरण केले. त्यानंतर दोघांना वाल्मिक पावलस जगताप यांच्या शेतात नेत त्यांच्यावर तेथे अनैसर्गिक अत्याचार करुन लाठ्या, गज, दगड, वायर आदी हत्यारांनी दोघा मित्रांना रात्रभर बेदम मारहाण करत दोघांची निर्घृण हत्या केली. शिर्डीमध्ये दहशत पसरावी, या हेतूने दोघांचेही मृतदेह शिर्डी बसस्थानकाजवळ टाकून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी विलास पंढरीनाथ गोंदकर (47, रा. बिरेगाव रोड, शिर्डी, नगर) यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात पाप्या शेखसह इतर आरोपींविरोधात अपहरण, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

श्रीरामपूरचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून दुहेरी हत्याकांड प्रकरणी 23 संशयितांना अटक केली. त्यांच्याविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तपासातून या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पाप्या शेख असल्याचे समोर आले. पाप्याची शिर्डीसह आजूबाजूच्या परिसरात दहशत होती. तसेच त्याच्यासह त्याच्या टोळीतील गुंडांविरोधात 22 हून अधिक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास करून संशयितांना अटक करून हत्याकांडाच्या दिवशीचा घटनाक्रम जुळविण्यास सुरुवात केली. पाप्या शेख टोळीविरोधात मोक्का लावल्याने या हत्याकांडाची सुनावणी नाशिकच्या विशेष न्यायालयात झाली. सुरुवातीला विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दोन साक्षीदार तपासले. त्यानंतर सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. अजय मिसर यांची नियुक्ती केली. अ‍ॅड. मिसर यांनी  41 साक्षीदार तपासले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्या. शर्मा यांनी 24 पैकी 12 आरोपींना जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. ठोस पुराव्यांअभावी उर्वरित 12 संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

निर्दोष सुटलेले संशयित

राजेंद्र किसन गुंजाळ (33), इरफान अब्दुल गनी पठाण (20), मुबारक ऊर्फ लड्ड्या ख्वाजा शेख (32), वाल्मीक पावलस जगताप (42), दत्तात्रय बाबूराव कर्पे (35), भरत पांडुरंग कुरणकर (49), बिस्मिल्ला मर्द पाप्या ऊर्फ सलीम शेख (25), संदीप श्यामराव काकडे (24), हिराबाई श्यामराव काकडे (49), मुन्ना गफूर शेख (24), राजू शिवाजी काळे (21), प्रकाश सुरेश अवसरकर (22) या संशयितांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

यामुळे झाले हत्याकांड

7 मार्च 2011 ला आरोपी पाप्या शेख त्याच्या कुटुंबीयांसह कल्याणहून शिर्डीच्या दिशेने येत होता. त्यावेळी शिंदे पळसेजवळ काही संशयितांनी गोळीबार करून पाप्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात पाप्या शेखचा मुलगा गणेश याचा मृत्यू झाला. गोळीबार करणार्‍या टोळीला प्रवीण गोंदकर आणि रचित पटणी यांनीच माहिती दिल्याचा संशय पाप्या शेखला होता. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी दोघांचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्या.