होमपेज › Ahamadnagar › शहापूर-गेवराई राष्ट्रीय महामार्गास मंजुरी

शहापूर-गेवराई राष्ट्रीय महामार्गास मंजुरी

Published On: Jan 13 2018 1:10AM | Last Updated: Jan 12 2018 11:41PM

बुकमार्क करा
अकोले : एस. बी. मेहेत्रे

केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने राज्यातील काही राज्यमार्गांना नॅशनल हाय वे (राष्ट्रीय हमरस्ता) चा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात शहापूर ते गेवराई या मार्गाचाही समावेश असून हा मार्ग शेंडी, भंडारदरा, अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, गेवराई असा असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे अकोले-संगमनेरसह अन्य तालुक्यांतील नागरिकांमधून स्वागत केले जात आहे.

केंद्रीय परिवहन विभागाने राज्य सरकारच्या  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त   मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई यांना याबाबत पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये राज्यातील काही राज्य महामार्गांना राष्ट्रीय हमरस्त्याचा दर्जा देण्याचे घोषित केले आहे. 

या पत्रामध्ये नगर जिल्ह्यातून जाणार्‍या गेवराई ते शहापूर या महत्त्वाच्या रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. या रस्त्याची लांबी 310 किलोमीटर आहे. सद्यस्थितीला या रस्त्याची अवस्था दयनीय आहे.  उत्तर नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील लोक मुंबईला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतात. परंतु अकोले तालुका हा डोंगराळ असल्याने तालुक्यातून जाणारा हा रस्ता अतिशय वळणाचा व मोठे घाटरस्ते असलेला आहे. त्यामुळे बहुसंख्य वाहनचालक संगमनेरहून सिन्नरमार्गे अथवा आळेफाटामार्गे मुंबईला जाणे पसंत करतात.

परंतु हे दोन्ही मार्ग लांबचे आहेत. त्यामुळे शेंडी-घाटघर- शहापूर हा रस्ता व्हावा, यासाठी घाटघर ते चोंढे या गावांना जोडणारा घाटरस्ता व्हावा, ही अकोलेकरांची फार जुनी मागणी होती. हा रस्ता झाला, तर अकोले-मुंबई हे अंतर सुमारे 40 किलोमीटरने कमी होणार आहे. परिणामी, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले या शहरांना मुंबईचे अंतर 40 किलोमीटरने कमी होणार आहे.

हा महामार्ग श्रीरामपूर शहर व तालुक्यातून  जाणार असल्याने या मार्गावर रहदारी वाढून श्रीरामपूर शहराची बाजारपेठ फुलेल. सध्या नेवासा व श्रीरामपूर  या दोन तालुक्यांचा विकास केवळ रस्त्याअभावी खुंटलेला आहे. या रस्त्यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नुकताच या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घोषित केल्याने उत्तर नगर जिल्ह्याची मागणी पूर्ण होईल.